चिंचघरी ग्रामपंचायत स्वस्थच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:57+5:302021-04-25T04:30:57+5:30
चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा भार अद्याप अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यावरच अवलंबून आहे. ग्रामपंचायत व ग्रामकृती ...

चिंचघरी ग्रामपंचायत स्वस्थच
चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा भार अद्याप अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यावरच अवलंबून आहे. ग्रामपंचायत व ग्रामकृती दलाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका आपले काम व्यवस्थित करीत आहेत. परंतु ग्रामपंचायतीनेही यामध्ये पुढाकार घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
आंजर्लेत लसीकरण सुरू
दापोली : कोविडचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी दापोली दौऱ्यावर आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा सभेनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष मरकड यांना आंजर्ले येथील प्राथमिक शाळेत कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आंजर्ले येथे नुकतेच लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आंजर्ले येथे या लसीकरण केंद्राचे उद्घाटन सरपंच स्वप्नाली पालशेतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
१०६ वाहनांना दंड
खेड : शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस, कार आदी सुमारे १०६ वाहनचालकांकडून १ लाख ६ हजारांची दंडात्मक कारवाई कशेडी घाटात आणि भरणानाका येथे पोलिसांनी केली. पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
महसूल कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस दापोली तालुका, शहर शाखा व माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून दापोली तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुजीब रुमाणे, पंचायत समितीच्या सभापती ममता शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शिरळमध्ये जंतूनाशक फवारणी
चिपळूण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शिरळ ग्रामपंचायतीने गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर शिरळ ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीसह उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने तिला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वाडीनिहाय फवारणी केली जात आहे.
चिपळुणात नालेसफाई मोहीम
चिपळूण : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सर्वत्र संचारबंदी सुरू असतानाच नगर परिषदेने शहरातील नाल्यांची साफसफाई सुरू केली आहे. आतापर्यंत निम्म्याहून अधिक नाल्यांची सफाई झाली असली, तरी जेथे जेसीबी जाऊ शकत नाही. त्या नाल्यांची सफाई होणार कधी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तत्पूर्वी शहरात जेसीबीच्या साहाय्याने सध्या नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी यांनी याकामी विशेष लक्ष घातले आहे.
मास्कसह पीपीई कीटचे वाटप
खेड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्कसह पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी माजी आमदार कदम यांनी पीपीई कीट व मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गटविकास अधिकारी गुरूनाथ पारसे यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सेवक तटकरे, सुरेश पवार, तानाजी सावंत, रूपेश महाडिक आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत स्फोटांच्या घटनांमध्ये कामगारांचा हकनाक जीव जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या स्फोटांची सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत गेल्या तीन महिन्यांत ६ स्फोट झाले असून, ८ कामगारांना प्राणास मुकावे लागले आहे.
आरोग्य यंत्रणेच्या मदतीला शिक्षक
गुहागर : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात ५६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. होम विलगीकरणापेक्षा कोविड केअर सेंटरकडे सर्वाधिक रुग्णांची भरती सुरू झाली आहे. आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबर शिक्षकही कार्यरत झाले आहेत. यामुळे हळुहळू मनुष्यबळ वाढवण्याचे नियोजन येथील प्रशासनाने सुरू केले आहे.