मुख्यमंत्र्यांची थापेबाजीच; शुक्रवारी समाचार घेणार
By Admin | Updated: July 22, 2015 01:10 IST2015-07-22T01:01:36+5:302015-07-22T01:10:05+5:30
नारायण राणे : विरोधकांनी रोखायला हवी होती चुकीची भाषणबाजी

मुख्यमंत्र्यांची थापेबाजीच; शुक्रवारी समाचार घेणार
कुडाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केवळ थापा मारल्या. त्याचा समाचार मी मुंबईत शुक्रवारी घेणार आहे. विरोधक कर्जमाफी मागतात, हे सरकार कर्जमुक्तीची घोषणा करीत आहे. कर्जमाफीला उत्तर नाही. ती देण्याची तयारीही नाही. अनेक पळवाटा घेऊन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चुकीची भाषणबाजी केली. ही भाषणबाजी विरोधकांनी रोखायला हवी होती. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर या सरकारकडे नाही. सर्व गोष्टी करू म्हणणारे सरकार पाच वर्षे तरी टिकेल काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
राणे यांनी कुडाळ येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शासनावर हल्ला चढविला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधोगतीकडे नेण्याचे काम या शासनाने केले आहे. या शासनाने कोकणावर अन्याय केला. सी वर्ल्ड प्रकल्पाची सरकारने वाट लावली. शासनाच्या नाकर्तेपणामुळे पर्यटनातून सिंधुदुर्गचा विकास करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार नाही. काँग्रेस या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहे. सिंधुदुर्गला अधोगतीकडे नेले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी वर्ल्ड प्रकल्प, चिपी येथील विमानतळ, रेडी बंदर या विकास प्रकल्पांना खो घातल्याने हे सरकार सिंधुदुर्गवर अन्याय करीत आहे. मागील शासनाने पर्यटनाच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पाहिले होते. मात्र, हे स्वप्न आता पूर्ण होणार नाही. कोकणात आंबा प्रकल्प देणार हा विषय हवेतला आहे. ओरोस येथील आय.टी. पार्क, दोडामार्ग येथील एम.आय.डी.सी यासाठी गेल्या आठ महिन्यांत विकासाच्या गोष्टीवर एक पाऊल पुढे सरकलेले नाही. शासनाचा हा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
कृत्रिम पाऊस कुठे पाडणार ते तरी सांगा ?
राज्यात पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार, असे सांगितले होते. महसूलमंत्री कुठे कुठे पाऊस पाडणार ते त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन राणे यांनी केले.
मीडियाची मुस्कटदाबी
या शासनकर्त्यांचा सुरू असलेला भ्रष्ट कारभार, खोट्या पदव्या बाहेर काढण्याचे काम विरोधकांनी केले आहे. हा कारभार ऐकायची आणि बघण्याची यांची तयारी नाही. त्यामुळेच मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार शासनकर्त्यांकडून होत आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
शासनाचा नाकर्तेपणा, सी वर्ल्ड प्रकल्प गोत्यात
जगातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आघाडी शासनाने १०० कोटी रुपये दिले होते; परंतु या सरकारने भूसंपादनाबाबतची परवानगी नाकारली आहे. सी वर्ल्डसाठी जागा संपादित होईल, असा विश्वास आता अधिकाऱ्यांनाही वाटत नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण होणार नाही.
मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मुद्दा खोटा
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणबाजीतील प्रत्येक मुद्दा खोटा आहे. या भाषणबाजीला शुक्रवारी आपण मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)