चिपळुणात घुमला धनगर समाजाचा गजर
By Admin | Updated: August 3, 2014 01:55 IST2014-08-03T01:01:40+5:302014-08-03T01:55:15+5:30
चिपळूण तहसिलदार कार्यालयावर मोर्चा

चिपळुणात घुमला धनगर समाजाचा गजर
चिपळूण : ‘येळकोट येळकोट जय मल्हार...’ असा गजर करीत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजबांधवांनी आज शनिवारी चिपळूण तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
धनगर समाजाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु आहे. अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करावा ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आज बहादूरशेख नाका, चिंचनाकामार्गे तहसील कार्यालय येथे हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धनगर समाजाचे चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत झोरे, उपाध्यक्ष रामचंद्र वरक, सखाराम ढेबे, शांताराम येडगे, सुरेखा येडगे, शंकर खरात, सेक्रेटरी तुकाराम बावदणे, सहसेक्रेटरी महादेव खरात, दत्ताराम शिंदे, गाणे सरपंच संगिता खरात, गाणे तंटामुक्त समिती अध्यक्ष कोंडीराम खरात, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश पांढरे, जिल्हाध्यक्ष अनंत आखाडे, धनगर समाज महासंघाचे जिल्हा सचिव सुरेंद्र झोरे, संजय गोरे, खजिनदार बाबू गोरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष शंकर झोरे, जिल्हा संघटक शंकर बा. झोरे, डी.डी. आखाडे, शैला कोकरे, दगडू शेळके, अनंत कोकरे, महादेव बावदणे, माजी सैनिक पांडुरंग बुरटे, बाबू खरात, जानू कोकरे आदी प्रमुख नेते या मोर्चाच्या अग्रभागी होते. काही वेळा पावसाच्या सरी अंगावर झेलत मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचला असता पोलिसांनी गेट बंद केले व एक शिष्टमंडळ तहसीलदार वृषाली पाटील यांना निवेदन देण्यासाठी आतमध्ये गेले. यावेळी निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)