चिपळुणातील चक्रधारी नारी...
By Admin | Updated: June 28, 2014 00:30 IST2014-06-28T00:28:51+5:302014-06-28T00:30:52+5:30
वैशाली चितळे : स्कूलबस चालविणारी पहिली महिला

चिपळुणातील चक्रधारी नारी...
चिपळूण : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगा उद्धारी’ असे स्त्रीचे आणि तिच्या कर्तृत्त्वाचे वर्णन केले जायचे. पण, सध्याच्या बदलत्या काळात या महिला पाळण्याच्या दोरीबरोबर संसाराच्या आर्थिक रथाचे सारथ्यही तितक्याच सक्षमपणे करत आहेत. चिपळुणात स्कूल बस चालवणाऱ्या वैशाली चितळे या महिलेचे उदाहरण त्यासाठी खूपच बोलके आहे. दिवसभराचे त्रासदायक ‘शेड्युल’ असलेल्या या क्षेत्रातील ही जिल्ह्यातील पहिलीच महिला आहे.
चिपळूणसारख्या फारसे विकसित न झालेल्या शहरात वैशाली चितळे या दररोज शाळेत मुलांची वाहतूक करतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्कूल बस चालविणारी ही महिला कौतुकास पात्र ठरत आहे. त्यामुळे चितळे या साहजिकच कळत-नकळत ‘ती चक्रधारी नारी’ म्हणून पालकांबरोबरच अन्य रिक्षाचालक, स्कूलबस चालक-मालक यांच्यामध्ये परिचित आहेत.
ऐश्वर्यसंपन्न माहेरातून आलेल्या चितळे यांना या कामासाठी सासरकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. लग्नानंतर त्यांनी लोटे एमआयडीसीमध्ये सात वर्षे नोकरी केली. त्यांचे पती राजेश हे पूर्वी रिक्षातून मुलांची वाहतूक करीत असत. आपणही चारचाकी वाहन चालवता येत असल्याने नोकरीपेक्षा मुलांची स्कूलबस काढावी, असा निश्चय करुन त्यांनीही यात पाऊल टाकले आणि यश मिळविले.
सात वर्षांपेक्षा अधिक काळ स्कूल बसचा व्यवसाय करीत असताना चितळे यांना सुरुवातीला अनेक चांगले वाईट अनुभव आले. परंतु, जिद्द न सोडता प्रत्येक गोष्टीला व प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घेत सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर हळूहळू येथील सर्व रिक्षा चालक - मालक यांनीही मोलाची साथ देत वेळप्रसंगी सहकार्य केले. एक महिला म्हणून आज सर्वांच्या सोबतीने चांगला मान मिळत आहे. आज अनेक महिला दुचाकी, चारचाकी शिकवा म्हणून सतत विचारणा करीत असतात. पण वेळेअभावी ते शक्य होत नाही. सकाळी ६.३० ते संध्याकाळी ६.३०पर्यंत शाळेतील मुलांना घेऊन धावता प्रवास सुरु असतो.
या व्यवसायाला सासुबाई राजश्री चितळे व नणंद दीपाली यादेखील माझ्या दहा वर्षांच्या मुलीला, आदितीला सांभाळून मदत करतात. या कामासाठी अनेकांनी आपला गौरवही केल्याचेही त्या सांगतात. त्यांचा आदर्श अन्य महिलांनी ठेवावा. (प्रतिनिधी)