‘मास्टर ट्रेड’कडून फसवणूक
By Admin | Updated: November 1, 2015 00:12 IST2015-10-31T22:27:13+5:302015-11-01T00:12:27+5:30
दापोलीत गंडा : विसापुरातील ग्रामस्थांची पोलिसांत धाव

‘मास्टर ट्रेड’कडून फसवणूक
खेड : रोखीच्या गुंतवणुकीवर ठराविक परतावा परत करण्याचे आमिष दाखवून पुणे येथील मास्टर ट्रेड लिंक कंपनीने दापोली तालुक्यातील विसापूर येथील इकबाल अली मालवणकर यांना ५ लाख रूपयांना फसवल्याचे समोर आले आहे. मालवणकर यांनी याप्रकरणी दापोली पोलिसात धाव घेतली आहे.
इकबाल मालवणकर हे विसापूर येथील रहिवासी आहेत. कंपनीचे संचालक संतोष पोपट थोरात (पुणे), नितीन मुरलीधर निकम आणि सोमनाथ बाबुराव सक्रे तसेच कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे हाशीम हुसेन पेटकर (जामगे) आणि मुस्ताक युसूफ कालसेकर (जामगे, दापोली) यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
५ लाख रूपयांची गुंतवणूक ही ३० महिन्यांकरीता असून, ही मुदत संपल्यानंतर ५ लाख रूपये मालवणकर यांना परत मिळतील, असेही या प्रतिनिधींनी सांगितले होते. त्याप्रमाणे कंपनीला १९ डिसेंबर २०१४रोजी आयसीआयसीआय बँकेचा ५ लाख रूपयांचा धनादेश मालवणकर यांनी कंपनीला दिला़ यानंतर मात्र कंपनीचा व्यवहार संशयास्पद राहिला आहे.
कंपनीकडून १४.०३.२०१५ रोजी २६ हजार ९०१ रूपये आणि १६.०४.२०१५ रोजी २६ हजार ९०० रूपये दापोली येथील मालवणकर यांच्या बँक खात्यात जमा झाले़ त्यानंतर २४.०२.२०१५ रोजीचा संतोष पोपट थोरात यांची सही असलेला आणि साक्षीदार हाशीम हुसेन पेटकर यांची सही असलेला सामंजस्य करार मालवणकर यांना देण्यात आला. त्यानंतर मे २०१५पासून मात्र कंपनीकडून मालवणकर यांना मासिक परतावा मिळणे बंद झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
आमिष दाखवले : तिघांविरोधात तक्रार दाखल
ही कंपनी ठराविक रक्कमेच्या गुंतवणुकीवर प्रती महिना परतावा देण्याचा व्यवसाय करत असल्याचे या प्रतिनिधींनी इकबाल मालवणकर यांना सुरूवातीला सांगितले होते. मात्र त्यानंतर या कंपनीने फसवणुकीस प्रारंभ केला. ५ लाख गुंतवणूक केल्यानंतर एक लाख रूपयांना प्रती महिना ५ हजार ४०० रूपये अदा केले जातील, असे मालवणकर यांना सांगण्यात आले. संतोष पोपट थोरात, हाशीम हुसेन पेटकर आणि मुस्ताक युसूफ कालसेकर यांनी संपर्क साधून कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली़