सरकारी कार्यालयाचा भार प्रभारींवरच
By Admin | Updated: January 13, 2016 22:04 IST2016-01-13T22:04:00+5:302016-01-13T22:04:00+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : अतिरिक्त जबाबदारी पेलवताना अधिकाऱ्यांची कसरत

सरकारी कार्यालयाचा भार प्रभारींवरच
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा भार सध्या प्रभारींवरच आहे. त्यामुळे अतिरिक्त काम सांभाळताना या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार मोहिते गेल्या नोव्हेंबरअखेर निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. या पदाचा कार्यभार जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांची पालघर येथे बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागीही गेल्या दीड वर्षापासून अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही.
त्यांच्या पदाचा कार्यभार रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, तर भूसंपादन अधिकारीपदही रिक्त आहे. सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची राजापूर प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचाही कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. त्यातच आता डिसेंबरअखेर अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कार्यभार आता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे याही सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे पद अद्याप रिक्त आहे.
सध्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने त्यांचा तात्पुरता पदभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशा दोन्ही आघाड्या देशभ्रतार यांना सांभाळाव्या लागत आहेत. अपर जिल्हाधिकारीपदही रिक्तच आहे.
मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी यांनाही रजेवर जाण्याची वेळ आली की, उर्वरित उपजिल्हाधिकाऱ्यांवर या तिन्ही पदाचा कार्यभार सांभाळण्याची वेळ येते. सध्या रिक्तपदांची उणीव अधिकच जाणवू लागली आहे. अतिरिक्त कामांचा बोजा सांभाळताना या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
गेल्या तीन वर्षात अधिकाऱ्यांची नवीन भरती झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातही अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासनाच्या महसुलावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. मात्र, शासनाकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. या रिक्त पदांचा कारभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने त्यांना कारभार करताना कसरतच करावी लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना न्याय देणे मुश्किल होत आहे. (प्रतिनिधी)
तहसील कार्यालय : कारभार प्रभारींचा
जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या प्रभारींवर सुरू असताना येथील तहसील कार्यालयातही हीच स्थिती आहे. तहसीलदार मारूती कांबळे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार प्रभारीवर आहे.