वीज मीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् हजारो रुपयांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:16+5:302021-09-15T04:37:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले तर ग्राहकावर कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येते. ...

वीज मीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् हजारो रुपयांचा दंड!
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले तर ग्राहकावर कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येते. वीज चोरीच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जाते. कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांत अवघी एकच कारवाई जिल्ह्यात करण्यात आली असून भरारी पथकाने ३४ हजार ३९० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
काही ग्राहक महावितरणच्या सीलबंद मीटरमध्ये छेडछाड करतात. वीज बिल कमी यावे यासाठी मीटरची गती कमी केली जाते किंवा वायर तोडून वीज मीटर बंद पाडले जाते. मात्र, असे प्रकार निदर्शनास आल्यास कलम १३५ अन्वये कारवाई केली जाते. महावितरणच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत असताना सुरुवातीला ग्राहकापुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवला जातो. त्यामुळे वीज चोरीच्या रकमेची दुप्पट रक्कम ग्राहकांकडून वसुली केली जाते. मात्र, जर ग्राहकाने रक्कम भरण्यास नकार दर्शविला तर मात्र फाैजदारी गुन्हा दाखल केला जातो.
शासकीय निर्बंध जारी असल्याने यावर्षी कारवाई करणे भरारी पथकाला शक्य झाली नाही. आठ महिन्यांत मीटर छेडछाडची एकच कारवाई करण्यात आली आहे. संबंधित ग्राहक दंडाची रक्कम भरण्यास तयार झाल्याने फाैजदारी गुन्हा टळला. ३४ हजार ३९० रुपये दंडाची रक्कम भरल्याने ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
कोरोनामुळे महावितरणकडून एकूणच कारवाईचे प्रमाण कमी आहे. ज्या कारणासाठी वीज मीटरचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आलेल्या १४ ग्राहकांवर कारवाई करून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे कारवाईवर परिणाम
कोरोनामुळे एप्रिलपासून पुन्हा लाॅकडाऊन झाले. कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी असल्याने गेल्या आठ महिन्यांत एकच कारवाई भरारी पथकाकडून करण्यात आली आहे. ग्राहकाकडून ३४३९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ग्राहक ज्या कारणासाठी वीज घेतात, मात्र त्याचा वापर अन्य कारणासाठी केला जात असल्याचे निदर्शनास येताच कलम १२६ अन्वये ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल केला जातो. वर्षभरात अशा १४ ग्राहकांवर कारवाई करून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे महावितरणच्या भरारी पथकाकडून कारवाईचे प्रमाण संथ आहे; परंतु शासकीय नियम शिथिल करण्यात आल्याने भरारी पथक पुन्हा कारवाईसाठी सज्ज झाले आहे.
वीज चोरीचे प्रकार कमी
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात वीज चोरी, आकडा टाकणे, मीटरमध्ये छेडछाड करणे असे प्रकार कमी आहेत. गेले दीड वर्ष कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. दोन वेळा लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षात भरारी पथकांकडील कारवाई फारशी होऊ शकली नाही. मात्र, भरारी पथके पुन्हा एकदा सक्रिय झाली आहेत.
चार पैसे वाचविण्यासाठी काही ग्राहकांकडून वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज मीटर बंद पाडले जातात किंवा गती कमी केली जाते. वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित ग्राहकावर कारवाई केली जाते. गेल्या आठ महिन्यांत एका ग्राहकावर कारवाई करण्यात भरारी पथकास यश आले आहे. गैरप्रकार आढळताच तातडीने कारवाई करणे भाग पडते. त्यामुळे ग्राहकांनी गैरमार्गाचा अवलंब करण्याऐवजी ग्राहकांनी कारवाई टाळावी. याशिवाय ग्राहक ज्या कारणास्तव वीज घेतात त्याऐवजी अन्य कारणासाठी वापर करतात, हाही गुन्हा असून त्यावरही कारवाई केली जाते.
- देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंता, महावितरण
वीज मीटरमध्ये छेडछाड करणे, आकडा टाकून वीज चोरी, मीटरची गती कमी करणे किंवा बंद पाडल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहकावर १३५ अन्वये कारवाई करण्यात येते.
ग्राहकाला तडजोडीची एक संधी देण्यात येते. दंडाची रक्कम भरू वीज जोडणी दिली जाते. दंडाची रक्कम भरण्यास नकार दर्शविला तर फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.