गुहागर राष्ट्रवादीत २१ वर्षांनंतर बदल
By Admin | Updated: April 10, 2015 00:34 IST2015-04-09T23:49:04+5:302015-04-10T00:34:40+5:30
अध्यक्षपदी मुळे : सिकंदर जसनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवड

गुहागर राष्ट्रवादीत २१ वर्षांनंतर बदल
गुहागर : गुहागर तालुक्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नवा अध्यक्ष म्हणून यापूर्वी तालुका सचिव म्हणून यशस्वीपणे काम करणाऱ्या विनायक मुळे यांचे एकमुखाने नाव सुचवण्यात आले. निरीक्षक सिकंदर जसनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. तब्बल २१ वर्षांनंतर अध्यक्षबदल झाल्याने या निवडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पद्माकर आरेकर यांनी काँग्रेस पक्षापासून तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. गुहागर मतदार काँग्रेसचे रामचंद्र बेंडल यांची काही वर्षांची आमदारकीची कारकिर्द वगळता गुहागर भाजपचा बालेकिल्ला होता. अनेक वर्षे स्थानिक पातळीवर सत्ता नसतानाही तालुकाध्यक्ष म्हणून पक्ष कार्यकर्ते व मतदारांना राष्ट्रवादी पक्षाशी बांधिल ठेवले.
एकमुखाने तालुकाध्यक्ष पदासाठी सर्वांनी पक्ष निरीक्षकांकडे शिफारस केल्यानंतर विनायक मुळे म्हणाले की, अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठेने काम केल्यानेच या पदासाठी माझे नाव सुचवून माझ्या केलेल्या कामाची पोचपावती दिली आहे. ज्यावेळी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी स्वत:हून तालुकाध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक नसल्याचे सांगितल्यानंतरच आपण तालुकाध्यक्ष पद घेण्यास तयारी दाखविल्याचे सांगितले.
सर्वत्र तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया चालू असताना बहुतांश ठिकाणी गटबाजी होताना दिसत आहे, असे असताना गुहागरमध्ये मात्र एकमुखाने तालुकाध्यक्षपदाचे एकच नाव देऊन खऱ्या लोकशाही प्रक्रियेचे दर्शन झाल्याची प्रतिक्रिया पक्ष निरीक्षक सिकंदर जसनाईक यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून पद्माकर आरेकर, दत्ताराम निकम, प्रांतीक सदस्य म्हणून भास्कर जाधव तसेच प्रभाकर शिर्के यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
तसेच पक्ष निरीक्षक राजू आंब्रे यांच्याकडे गुहागर शहर अध्यक्षपदासाठी संतोष वरंडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती पद्माकर आरेकर यांनी दिली.
यावेळी सभापती राजेश बेंडल, उपसभापती सुरेश सावंत, रामचंद्र हुमणे, लतिफ लालू, विभावरी मुळे, नगराध्यक्ष जयदेव मोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरेकर यांची दखल
गेली अनेक वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून पक्षसेवा केल्यानंतर आता तालुक्याच्या कारभारातून मुक्त होत असलो तरी जिल्हाध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक असल्याचे मत पद्माकर आरेकर यांनी जाहीर केले. यावर पक्ष निरीक्षक सिकंदर जसनाईक यांनी या बैठकीच्या अनुषंगाने आरेकर यांचे नाव वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असून, अनेक वर्षांच्या पक्षनिष्ठेचा विचार करता पक्ष याबाबत नक्की विचार करेल, असे स्पष्ट केले.