नद्यांमधील गाळ उपसण्याचे आव्हान : पाटील

By Admin | Updated: January 15, 2015 23:33 IST2015-01-15T20:49:53+5:302015-01-15T23:33:37+5:30

फणसवणे येथे विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रारंभ झाला

Challenges of the drainage of rivers: Patil | नद्यांमधील गाळ उपसण्याचे आव्हान : पाटील

नद्यांमधील गाळ उपसण्याचे आव्हान : पाटील

रत्नागिरी : नदी ही मानवी जीवनाच्या उगमाचा मूळ स्रोत आहे. आज या नद्यांचे स्रोत होरले आहेत. ते मुक्त करून पर्यावरणाशी जोडणे हे आजच्या युवा पिढीसमोर मोठे आव्हान आहे. हे तगडे आव्हान नवनिर्माणने स्वीकारले, ही अत्यंत उल्लेखनीय बाब असल्याचे गौरवोद्गार मुंबई विद्यापीठाच्या येथील उपकेंद्राचे समन्वयक डॉ. पांडुरंग पाटील यांनी काढले.
येथील नवनिर्माण महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथे विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रारंभ झाला. संगमेश्वर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ. पांडुरंग पाटील उपस्थित होते. यावेळी नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, कार्यवाह मोहन खातू, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, शिवसेना जिल्हा नेते राजेंद्र महाडिक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर नारकर, शंकर भिंगार्डे, विलास कोळपे, दिलीप रहाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अभिजीत हेगशेट्ये यांनी या शिबिराच्या कामाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच संगमेश्वरची पूरपरिस्थिती कथन केली. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभा राहणारा बंधारा एक गाव उभा करू शकतो, पुरापासून मुक्त करू शकतो, हा संदेश निश्चितपणे या युवा शक्तितून दिला जाणार आहे.
या विद्यापीठस्तरीय शिबिरामध्ये मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शिबीराच्या पहिल्याच रात्री डॉ. भगवान नारकर यांचे प्राणायामवर व्याख्यान झाले. शिबिरार्थींच्या जेवणाच्या सामानाची जबाबदारी संगमेश्वर व्यापारी मंडळाने उचलली आहे.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर नारकर यांचे आभार मानण्यात आले. संगमेश्वर येथील श्रमदान कार्यात सरपंच विवेक शेरे, बाळू शेट्ये, यांचे सहकार्य लाभले. प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Challenges of the drainage of rivers: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.