हर्णै बंदरातील मच्छिमारांचे उद्यापासून साखळी उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST2021-03-21T04:30:37+5:302021-03-21T04:30:37+5:30
फोटो ओळी पारंपरिक मच्छिमार बांधवांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन दिले आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : एलईडी पर्ससीन ...

हर्णै बंदरातील मच्छिमारांचे उद्यापासून साखळी उपाेषण
फोटो ओळी पारंपरिक मच्छिमार बांधवांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन दिले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : एलईडी पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचे कंबरडे मोडले आहे. भविष्यात पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही वेळ केवळ एलईडी मासेमारीमुळेच आली असल्याने तत्काळ तांत्रिक मासेमारी बंद करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांमधून जोर धरत आहे. याविराेधात हर्णै बंदरातील पारंपरिक मच्छिमारांनी २२ मार्चपासून साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मच्छिमारांतर्फे तहसीलदार वैशाली पाटील यांना देण्यात आले आहे.
एलईडी मासेमारीमुळे कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. पारंपरिक मच्छिमारांना मासे मिळेनासे झाले असून, समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना डिझेलचा खर्चसुद्धा सुटत नसल्याने हर्णै बंदरातील शेकडो बोटीने आंजर्ला खाडी गाठली आहे. या खाडीत शेकडो बोटी नांगर टाकून उभ्या आहेत, तर हर्णै बंदरातही अनेक बोटी नांगर टाकून उभ्या आहेत. तांत्रिक मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारीवर उपासमारीची वेळ आली आहे. कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमार जगविण्यासाठी सरकारने एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करावी व ती मासेमारी तत्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परराज्यातील बोटी महाराष्ट्रच्या हद्दीत येऊन मासेमारी करण्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी दापोली, गुहागर, मंडणगड मच्छिमार संघर्ष समितीने २२ मार्चपासून हर्णै बंदरात आमरण साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.