आयएसओ नामांकन शाळांची शंभरी

By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T22:32:41+5:302016-01-02T08:29:27+5:30

एकनाथ आंबोकर : नवीन वर्षाचा संकल्प

Centennial of ISO nominee schools | आयएसओ नामांकन शाळांची शंभरी

आयएसओ नामांकन शाळांची शंभरी

रत्नागिरी : सन २०१६मध्ये जिल्हा परिषदेच्या १०० शाळांना आयएसओ नामांकन मिळवून देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल प्राथमिक शाळा ही जिल्ह्यातील एकमेव आयएसओ नामांकन शाळा आहे. हे नामांकन मिळाल्यामुळे ही शाळा देशपातळीवर चमकली आहे. अंजनवेल शाळेने शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना विविध बाबींची माहिती मिळावी, यासाठी शाळांच्या भिंतींवर तारांगण, ऐतिहासिक देखावे रेखाटण्यात आले आहेत. त्याचबरोबर अन्य विविध उपक्रमही राबवण्यात आले आहेत. हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या अन्य शाळांमध्येही राबवण्याचा विचार सुरु आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा हे नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नामांकन मिळवण्यासाठी भौतिकदृष्ट्या शाळा सक्षम असणे आवश्यक आहे. शाळेचा रेकॉर्ड व्यवस्थित असणे, शाळेच्या सभोवतालच्या परिसरातील झाडांचा वापर कशासाठी केला जातो, त्यांचा उपयोग काय तसेच त्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिंनींसाठी वेगळ्या शौचालयाची सोय, शाळेचा कोपरा न कोपरा शैक्षणिकदृष्ट्या सजवलेला असणे आवश्यक आहे. तसेच शाळेत उपक्रमशीलता आदींबाबतची पाहणी करुन हे नामांकन समितीकडून देण्यात येते. त्यासाठी शैक्षणिक दर्जा पाहिला जात नाही, ही विशेष बाब आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ग्रामीण भागातील १०० शाळांना या नवीन वर्षामध्ये कशाप्रकारे आयएसओ नामांकन मिळवता येईल यासाठी शिक्षणाधिकारी आंबोकर प्रयत्न करत आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु असल्याचे आंबोकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)

शिक्षणाच्या गोडीसाठी : कौतुकास्पद उपक्रम
गुहागर तालुक्यातील अंजनवेल ही शाळा आयएसओ नामांकित झाल्यानंतर जिल्हा परिषदेने अन्य शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. हा उपक्रम राबवल्यामुळे शाळांच्या प्रगतीमध्ये भर पडेल तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असा विश्वास आहे.

विद्यार्थ्यांना फायदा...
अंजनवेल शाळेने हा उपक्रम राबवताना अनेकविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबवले. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.

Web Title: Centennial of ISO nominee schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.