देवरुखात ३५० बेड्सचे काेविड सेंटर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:54+5:302021-04-20T04:32:54+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुका प्रशासकीय यंत्रणा कोविडचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेला सर्वपक्षीयांसह विविध कंपन्या, ...

देवरुखात ३५० बेड्सचे काेविड सेंटर सज्ज
देवरुख : संगमेश्वर तालुका प्रशासकीय यंत्रणा कोविडचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेला सर्वपक्षीयांसह विविध कंपन्या, सामाजिक संस्था, उद्योजक यांचा हातभार लागत आहे. तालुक्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सद्यस्थितीला ३५० बेड्स असलेले कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ५५० बेड्स उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली.
तसेच डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून मातृमंदिर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याबाबतच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी रविवारी तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे, देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे आणि मातृमंदिरचे एसएमएसचे अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात ५२ बेड्सचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, देवरुखसह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बेड्सची संख्या कमी पडू लागली आहे. ही अडचण लक्षात घेऊन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी आठल्ये-सप्रे-पित्रे आणि अरुंधती पाध्ये इंग्लिश मिडीयमची इमारतच उपलब्ध करून दिली.
देवरुख महाविद्यालयाच्या परिसरात आता सुमारे ३०० बेड्स कोविड सेंटरकरिता तैनात ठेवण्यात आले आहेत. याकरिता माजी मंत्री रवींद्र माने यांनी २५० बेड्स दिले आहेत, तर आमदार शेखर निकम यांनी ऑक्सिमीटर आणि थर्मल गन उपलब्ध करून दिले आहे. वनाझ इंजिनिअर कंपनीकडून ५० बेड्स देण्यात आले आहेत.
कोविड सेंटरमधील रुग्णांना सकस आहार मिळावा, यासाठी उद्योजक उदय लोध यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. कोविड सेंटरकरिता अन्य सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरुख नगरपंचायत यांचीही मदत होत आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्राम कृती समित्यांनीही सजग राहून आपली भूमिका पार पाडावी. खरे तर ग्राम कृती दलाच्या सहकार्यामुळेच कोरोनाला आळा बसवता आला आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
...............................
फोटो:
देवरुख येथे कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. (छाया : सचिन मोहिते)