मिठाई व्यावसायिकांना बैठकीत दिल्या दक्षतेच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:42+5:302021-09-11T04:31:42+5:30
रत्नागिरी : सणासुदीच्या काळात मिठाई विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी मिठाई व्यावसायिक आणि ...

मिठाई व्यावसायिकांना बैठकीत दिल्या दक्षतेच्या सूचना
रत्नागिरी : सणासुदीच्या काळात मिठाई विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी मिठाई व्यावसायिक आणि उत्पादक यांच्यासमवेत नुकतीच बैठक घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कक्षात झालेल्या या बैठकीला वाघमारे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चाैधरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या मिठाई व्यावसायिक आणि उत्पादकांना गणेशोत्सव काळात मिठाईबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत लेखी पत्रके देण्यात आली. ही पत्रके व्हाॅट्सॲपच्या विविध ग्रुपवर पाठविण्याचे आवाहन यावेळी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व मिठाई व्यावसायिकांना करण्यात आले. आस्थापनेचा परिसर पर्यावरणीयरित्या स्वच्छ व कीटकांपासून सुरक्षित असावा, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार खाद्यपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्न हाताळू नये, मिठाई तयार करताना फुडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प (१०० पीपीएमपेक्षा कमी) वापर करावा, मिठाईच्या दर्शनी भागावर वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, बंगाली मिठाई २४ तासांच्या आत खाण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनवणाऱ्या व हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावा, मिठाईवर वापरला जाणारा साेनेरी व चांदीचा वर्ख उच्च दर्जाचा असावा, पदार्थ हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावेत, कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही मिठाई विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला शहरातील प्रमुख मिठाई व्यावसायिक व उत्पादक उपस्थित होते.
मिठाई उत्पादक - विक्रेत्यांनी कायद्यांतर्गत तरतुदींचे काटेकाेरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मिठाईच्या दर्जाबाबत कुठलीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या ८०५५४३६१८८ किंवा १८००-२२२३८५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे यांनी केले आहे.