मात्र सावधानता हवीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:14+5:302021-08-24T04:35:14+5:30
गेले दीड वर्ष कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. उद्योग, व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

मात्र सावधानता हवीच
गेले दीड वर्ष कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. उद्योग, व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कित्येक कुटुंबांनी आपले सदस्य, निकटवर्ती गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. अनेक मुलांचे पालक कोरोनामुळे दगावले असल्याने मुले पोरकी झाली आहे. शासनाने या मुलांसाठी आर्थिक साहाय्य घोषित केले असून, काही संस्थांनी शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु या मुलांच्या भविष्याचा प्रश्नही अवघड आहे. एकूणच कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी धोका मात्र कमी झालेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवताना लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरीही शाळा सुरू करण्यासाठी सरकार घाई करीत आहे.
अद्याप लसीकरण संथ गतीने सुरू आहे. कित्येकांना पहिलाच डोस अद्याप प्राप्त झालेला नाही. प्रशासनाने किमान लसीकरण तरी जलद गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून धोका कमी होण्यास मदत होईल. प्रशासनाने सर्व व्यवहार खुले करण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र त्या सवलतीचा फायदा किती घ्यावा, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पावसाळी सहली, धबधबे, समुद्रकिनाऱ्यावरील सहलींचे आयोजन सध्या जाेमाने सुरू आहे. मुलांचे ऑनलाइन वर्ग असल्याने नोकरदार आईवडील सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन वीकेंड साजरा करीत आहेत. पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. आनंदाच्या ओघात सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर असो वा अन्य कोरोना नियमावलींचे पालन करण्याचा विसर पडत आहे. गणेशोत्सवही अगदी तोंडावर आहे. त्यामुळे येणारा सण आनंदाने साजरा करण्यासाठी व कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शासकीय नियमावलींचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. थोडीशी सावधानता नक्कीच लाट रोखण्यास मदत करणार आहे. शासनाकडून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र या उपाययोजना राबविणे जितके गरजेचे आहे, तितकेच लाट रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. गेले दीड वर्ष जनतेची प्रगती खुंटली आहे. विकासाच्या नावाने बोंबच आहे. महागाईचे संकट तर आ वासून उभेच आहे. एकूणच विदारक परिस्थितीचा सामना करताना सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. जर तिसरी लाट आली तर नक्कीच विषमतेला सामोरे जावे लागणार आहे. याचे तीव्र पडसाद सर्व स्तरावर उमटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडीशी सावधानता घेतली तर नक्कीच कोरोना हद्दपार होण्यास मदत होईल.