जातीचे दाखले अडकले तलाठी चौकशीत
By Admin | Updated: March 30, 2015 00:24 IST2015-03-29T22:21:02+5:302015-03-30T00:24:48+5:30
दालदी समाज : ‘शासकीय’ कारभाराने मच्छिमार झाले हैराण

जातीचे दाखले अडकले तलाठी चौकशीत
रत्नागिरी : मुस्लिम मच्छिमार दालदी समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. आता दाखले तलाठी चौकशीच्या गर्तेत अडकले जात असल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत.
मुस्लिम मच्छिमार दालदी समाजाला इतर मागासवर्गीयांचे दाखले मिळत असले तरी ते सहजासहजी मिळत नाहीत. समाजाकडे योग्य नेतृत्व नसल्याने या समाजाला दाखल्यांसह इतर शासकीय कामांमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा कागदपत्रांची पूर्तता असताना जाणीवपूर्वक अमूकच कागद पाहिजे, असे सांगून दाखला देण्यास सहा ते सात महिने काढले जातात. त्यामुळे सेतूचे उंबरठे झिजवून अनेक जणांनी दाखला मिळविण्याचा नादच सोडून दिला.
गरीब, गरजू आणि विकासापासून नेहमीच वंचित राहिलेल्या या समाजाला आता जातीचा दाखला मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तलाठी चौकशी करताना यापूर्वी तलाठ्याकडे लाभार्थी अर्ज हातीच घेऊन जात होता. आता तलाठी चौकशीसाठी अर्ज सेतू कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर तो टपालातून त्या-त्या तलाठ्यांकडे चौकशी जातो. मात्र, एका तलाठी चौकशीसाठी दोन ते तीन महिने जात असल्याने दाखल्यासाठी खूप उशिर होत आहे. त्यासाठी तलाठी चौकशीसाठी पूर्वीचीच पध्दतीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी या समाजाकडून करण्यात येत आहे. जेणेकरुन दाखला मिळण्यास उशीर होणार नाही. (शहर वार्ताहर)
दालदी समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळविताना सेतूमध्ये पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मच्छिमार बांधवांची त्यामुळे ससेहोलपट होत आहे. याप्रकरणी शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.