खोटे दाखलेप्रकरणी दोघांची वेतनवाढ रोखली
By Admin | Updated: December 7, 2015 00:18 IST2015-12-06T23:02:00+5:302015-12-07T00:18:34+5:30
जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

खोटे दाखलेप्रकरणी दोघांची वेतनवाढ रोखली
रहिम दलाल-- रत्नागिरी--आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांची वेतनवाढ रोखली, तर अन्य पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. खोट्या पदवीप्रकरणानंतर थंड होऊ लागलेल्या जिल्हा परिषदेत आता आंतरजिल्हा बदलीसाठी खोट्या दाखल्यांचे प्रकरण गाजू लागले आहे. हा प्रश्न सध्या जिल्हा परिषद वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदाराचा दाखला खोटा जोडण्यात आल्याचे सांगली जिल्हा परिषदेने उघडकीस आणले होते. त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे सात शिक्षक असल्याचे पुढे आले होते. त्यामध्ये शिक्षक - शिवाजी कोयनाप्पा करवर, चंद्रकांत दत्तात्रय कोरबू, रेवाप्पा सर्जेराव खोत, शिक्षिका - कविता दत्तात्रय आंबी, सुशिला सुर्याबा सलगर, आरती वसंत चव्हाण व आशाताई तानाजी मंडळे यांचा समावेश आहे.खोटे दाखले जोडून या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचा उघडकीस आला. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार यांनी दखल घेतली होती. त्यानंतर त्या शिक्षकांवर त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याबाबत त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे त्या सातही शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यांची खातेनिहाय चौकशी करुन मूळ कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. या झालेल्या चौकशीमध्ये शिक्षिका कविता आंबी आणि आशाताई मदने यांनी खोटी कागदपत्र जोडल्याचा गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी या दोघांंचीही वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.तसेच शिवाजी करवर, चंद्रकांत कोरबू, सुशिला सरगर, आरती चव्हाण आणि रेवाप्पा खोत या शिक्षकांनी हात वर करीत जोडलेले कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगून गुन्हा नाकबूल केला. त्यामुळे जिल्हा परिषदेने या पाचही जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ माजली आहे.
मुलांना काय धडे देणार? : खोटे बोलण्यात गुरुजींचा कहर
आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडल्याचे प्रकरण सांगली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. नातेवाईक शासकीय सेवेत नसतानाही त्यांनी ते सेवेत असल्याचे दाखले जोडल्याचे नाकारून गुरुजींनी खोटे बोलण्याचा कहरच केला आहे. त्यामुळे असे सत्य बोलण्याचे मुलांना काय धडे देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फौजदारी अद्याप नाही
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण विभाग त्यांची मूळ कागदपत्र पोलिसांसमोर सादर करूशकलेला नाही. त्यामुळे त्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई अद्याप झालेली नाही.