सावकाराकडून पिळवणूक झाल्यास थेट संपर्क साधा : राेहिदास बांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:48+5:302021-06-30T04:20:48+5:30
चिपळूण : येथील सावकारीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संबंधित यंत्रणाही सतर्क झाली आहे. सावकाराकडून कर्ज घेतलेल्यांची जर पिळवणूक होत असेल, ...

सावकाराकडून पिळवणूक झाल्यास थेट संपर्क साधा : राेहिदास बांगर
चिपळूण : येथील सावकारीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संबंधित यंत्रणाही सतर्क झाली आहे. सावकाराकडून कर्ज घेतलेल्यांची जर पिळवणूक होत असेल, तर थेट सहायक निबंधक कार्यालयाकडे संपर्क साधा, असे आवाहन येथील सहायक निबंधक रोहिदास बांगर यांनी चिपळूणवासीयांना केले आहे, तसेच यापुढे सावकारी करणाऱ्यांची तपासणी मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिपळुणात सावकारी करणाऱ्यांभोवतीचा फास अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.
शहरातील वडनाका परिसरातील अभिजित गुरव याने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढे आल्यानंतर आता सावकारीबाबत तक्रारीही दाखल होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील सहायक निबंधक बांगर यांनी माहिती देत नागरिकांना जागरूक केले आहे.
चिपळूणमध्ये एकूण १९ परवानाधारक सावकारी करणारे असून, तारण आणि विनातारण अशा दोन पद्धतीत ते कर्ज देऊन तारण कर्जाला वार्षिक १२ टक्के, तर विनातारण कर्जाला वार्षिक १५ टक्के व्याज आकारण्याची परवानगी असल्याची माहिती त्यांनी दिली. एखादा कर्जदार थकीत असेल तर त्याच्याबद्दल सावकार दिवाणी न्यायालयात जाऊन कर्ज वसुलीसाठी दाद मागू शकतो. इतकेच अधिकार सावकारी करणाऱ्याकडे आहेत. यापेक्षा जास्त अधिकार त्यांना दिलेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
याव्यतिरिक्त प्रॉपर्टी, वाहने जप्त करण्याचे कोणतेही अधिकार त्यांच्याकडे नाहीत. तारण कर्ज असले तरीही प्रॉपर्टी जप्त करता येत नाही. कायद्यालाही हे अपेक्षित नाही, तसेच सावकारी कर्ज देणाऱ्या परवानाधारकांनी रोजच्या रोज रजिस्टर नोंद करावयाची आहे. त्याचे ऑडिट आमच्या कार्यालयाकडून करण्याचा नियम आहे, तसेच सहायक निबंधक कधीही तपासणी करू शकतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे.
चिपळूणमध्ये सावकारीचे जे प्रकार उघडकीस येत आहेत त्याबाबत ते म्हणाले की, अशाप्रकारे जर कर्जदाराची जर पिळवणूक होत असेल तर त्यांनी कोणत्याही दमदाटीला न घाबरता थेट सहायक निबंधक कार्यालयाकडे संपर्क साधवा, तसेच लेखी तक्रार करावी किंवा पोलिसांकडे संपर्क साधावा. मग तो परवानाधारक असो किंवा बेकायदेशीर सावकारी करणारा असो. कर्जदाराच्या तक्रारीची तत्काळ दखल या कार्यालयाकडून घेतली जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या सावकारावर आता पोलीस स्थानकात गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची दखल देखील या कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. योग्य त्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.