वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ

By Admin | Updated: December 16, 2014 00:14 IST2014-12-15T22:15:19+5:302014-12-16T00:14:35+5:30

पर्यटकांसाठी सुरक्षितता : हातखंबा वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; शिस्त पाळा, अपघात टाळार्

Carrying on those who break the traffic rules | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ

रत्नागिरी : यंदाच्या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा व रत्नागिरी - नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या हातखंबा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण १० हजार ९४६ वाहनांवर व चालकांवर कायदेशीर कारवाई करून ११ लाख ६९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी सांगितले की, महामार्ग पोलीस वाहतूक विभाग, महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील अवजड व अतिरिक्त भार वाहून नेणारी वाहने, हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहनांच्या काचांवर फिल्म लावणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहनांवर रिफ्लेक्टर न लावणे, मालवाहतूक करताना वाहनातून रस्त्यावर पाणी सांडणे, वाहनाचे टेललॅम्प, इंडिकेटर सुरु नसणे, अवजड ट्रेलर यांसारख्या वाहनातून वाहनांचा फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप, लोखंडी सळीसारखे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम डिसेंबर २०१४च्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागून अपघात कमी व्हावेत, हा मुख्य उद्देश आहे.
कोकणात सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पर्यटन हंगाम असल्याने दोन्ही महामार्गावर वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो. प्रसंगी जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे महामार्गावरची वाहतूकही विस्कळीत होते. वाहन चालकांना शिस्त लागण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. दंडात्मक कारवाई ही मुंबई - गोवा महामार्गावरील बावनदी, निवळी ते खारेपाटण, खाडेवाडी व रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा गाव या टप्प्यामध्ये अनुक्रमे ८५ किलोमीटर ते ७३ किलोमीटरच्या दरम्यान गस्तीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. अकरा महिन्यांमध्ये विशेष मोहिमेंतर्गत हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणे, यामध्ये २६६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महामार्गावर अती वेगाने वाहन चालविणाऱ्या १५९ चालकांवर कलम १८४ अन्वये कारवाई करुन ७९ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला. वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावल्याबद्दल २५२ वाहनांवर कारवाई करुन २५ हजार २०० इतका दंड वसूल करण्यात आला. चारचाकी वाहनांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १० हजार २६९ वाहनांवर कारवाई करुन १० लाख ३७ हजार ९०० रुपये इतकी रक्कम वसूल केली. या साऱ्या तपासणीनंतर दोन्ही महामार्गावरील वाहतूक नियमाला अधिन राहून होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Carrying on those who break the traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.