उमेदवारांची मतमोजणीसाठी होणार पायपीट
By Admin | Updated: October 19, 2014 00:29 IST2014-10-19T00:29:20+5:302014-10-19T00:29:45+5:30
रवींद्र हजारे : २३ फेऱ्यात कळणार चिपळूण मतदारसंघाचा निकाल...

उमेदवारांची मतमोजणीसाठी होणार पायपीट
चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुदक्षिणा सभागृह, युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे होणार आहे. या आवारात उमेदवारांना गाडी व मोबाईल आणता येणार नाही. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गेटपासून उमेदवारांनी चालत मतमोजणी केंद्रात जायचे आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांनी अथवा प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे यांनी केले आहे.
उद्या (रविवारी) सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. प्रथम पोस्टल मतमोजणी होईल. याची जबाबदारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने यांच्याकडे आहे. यासाठी स्वतंत्र टेबल व कर्मचारी देण्यात आले आहेत. एकूण १२२२ कर्मचारी मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील आज शनिवारी दुपारपर्यंत ९५४ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. उद्या मतमोजणीच्या वेळी सकाळी ८ वाजेपर्यंत येणाऱ्या मतपत्रिका स्वीकारण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी १४ टेबले लावण्यात आले असून, २३ फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. एकावेळी १४ मतदान यंत्र उघडली जातील. यासाठी प्रत्येक टेबलला ४ अधिकारी व कर्मचारी असतील. शिवाय सिलिंग टीम, संगणक टीम, आॅनलाईन डाटा एंटरीसाठी व्यवस्था आहे. हायवेच्या बाजूला असणाऱ्या गेटने मतमोजणी कर्मचारी, अधिकारी, उमेदवार व त्यांचा एक प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे.
मतमोजणीसाठी येणाऱ्या एजंटना कऱ्हाड रोडच्या गेटने आत घेतले जाणार आहे. कोणालाही मोबाईल आणता येणार नाही. त्यामुळे या भागात कोणीही मोबाईल आणू नये, असे निवडणूक निर्णय अधिकारी हजारे यांनी सांगितले. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. हायवेच्या दिशेला अभिषेकजवळ भाजप, रॉयलनगरच्या बाजूला काँगे्रस तर मार्कंडी येथे आमदार चव्हाण यांच्या कार्यालयाजवळ शिवसेना, पेट्रोल पंपाकडे राष्ट्रवादी काँग्रेस व मधल्या भागात अपक्ष व इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील. उमेदवाराला मतदान केंद्राच्या आतमध्ये गाडी नेता येणार नाही. हायवेपासून उमेदवार चालत मतमोजणी केंद्रात जातील. चिपळूण-कऱ्हाड रोड वाहतुकीसाठी मार्कंडी भागात बंद राहणार आहे. मात्र, गरज असल्यास दुचाकीस्वारांना परवानगी दिली जाईल. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील, वैशाली माने, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, अव्वल कारकून प्रकाश सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)