अराजकतेच्या विरोधासाठीच उमेदवारी

By Admin | Updated: July 21, 2016 00:56 IST2016-07-20T23:12:06+5:302016-07-21T00:56:16+5:30

रामनाथ मोते यांचे प्रतिपादन : चिपळूणच्या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फू र्त प्रतिसाद

The candidacy is against the anarchy | अराजकतेच्या विरोधासाठीच उमेदवारी

अराजकतेच्या विरोधासाठीच उमेदवारी

वाटूळ : आजही मी २० बाय १२च्या भाड्याच्या खोलीत राहात आहे. राज्यातील सगळ्यात गरीब आमदार असलो तरीही कार्यकर्त्यांच्या पाठींब्यामुळे मी सर्वात श्रीमंत आमदार आहे. आगामी काळात शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता असून, या क्षेत्रात अराजक माजू शकते. अशावेळी माझा सर्वसामान्य शिक्षक कोणाच्याही पायाशी गुलाम बनून राहू नये यासाठीच मी पुन्हा शिक्षक आमदारकीसाठी उभा आहे, अशी भावनिक साद विद्यमान शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी घातली.
चिपळूण येथील युनायटेड स्कूलमध्ये झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. १२ पैकी ११ जिल्ह्यांनी माझ्या उमेदवारीसाठी लेखी ठराव देऊनही या मताची पायमल्ली करत संघटनेने आपल्याला उमेदवारी नाकारली. संघटनेच्या या एकाधिकारशाहीमुळेच कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीचा आग्रह धरला व आज मी ही निवडणूक लढवत असल्याचे मोते यांनी सांगितले. मागील ३६ वर्षांपासून शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मी माझा कार्यकाल खर्ची घातला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस असूनही चिपळूण येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाभरातून सव्वाशेच्या आसपास कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा ठामपणे आमदार मोतेंच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कोकण विभागाचे माजी अध्यक्ष शंकर मोरे यांनीही आमदार मोतेंच्या कामांचे विविध दाखले देत असा आमदार पुन्हा होणे नाही, त्यामुळे त्यांना विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी युनायटेड स्कूल संस्थेचे इदाते, विद्यार्थी सेवक पतपेढी अध्यक्ष सुधीर घागस, भिवंडी महानगरचे कार्यवाह ज्ञानेश्वर गोसावी, जिल्हा सचिव राधाकृष्ण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद त्रिपाठी यांनी केले तर आभार चिपळूणचे उपाध्यक्ष एस. एस. पाटील यांनी मानले. (वार्ताहर)

संपत्ती जशीच्या तशी
१२ वर्षे आमदारकीच्या काळात माझी सांपत्तीक स्थिती जशीच्या तशीच आहे. त्यामुळे मला स्वत:साठी ही निवडणूक लढवायची नाही तर शिक्षकांच्या कल्याणासाठी ती लढवायची आहे, असे मोते यावेळी म्हणाले.

Web Title: The candidacy is against the anarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.