तिवंडेत नळजोडणी रद्द करा

By Admin | Updated: August 12, 2015 23:11 IST2015-08-12T23:11:17+5:302015-08-12T23:11:17+5:30

राष्ट्रवादीची मागणी : शहराबाहेर २४ तास पाणी ?

Cancel tuition in Tivand | तिवंडेत नळजोडणी रद्द करा

तिवंडेत नळजोडणी रद्द करा

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन शहराच्या हद्दीबाहेरील बांधकाम विकासकाने उभारलेल्या ४१० सदनिकांना शीळ धरणाच्या जलवाहिनीवरून जोडणी देण्यात आली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना शहराबाहेर २४ तास पाणी देण्याचा हा निर्णयच चुकीचा व रत्नागिरी शहरवासीयांवर अन्याय करणारा आहे. ही जोडणी नियमबाह्य असून तातडीने रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत तिवंडेवाडी या शहराच्या बाहेरील गावात असलेल्या खासगी विकासकाच्या ४१० सदनिका असलेल्या संकुलाला पाण्याची जोडणी देण्याच्या ठरावाला शिवसेनेने विरोध केला होता. तसे पत्रही नगराध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर इतिवृत्तात हा ठराव मंजूर असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे पुढील सभेत शिवसेनेने याला जोरदार आक्षेप घेत ठराव मंजूर करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र दिले होते.
याबाबत योग्य भूमिका मांडता न आल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही ही जोडणी मान्य झाली. मात्र, ही जोडणी चुकीच्या पध्दतीने देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडण्यात आली नाही. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनीच पाहणी करून ही जोडणी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शहराला मुबलक पाणी मिळते, असे नगराध्यक्ष म्हणत असतील तर एमआयडीसीकडून पाणी का घ्यावे लागते. विकासकाला दिलेल्या या थेट जोडणीमुळे साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात पाणी येण्याचा वेग कमी होणार आहे. तसेच ४१० कुटुंबांनाही थेट जोडणीमुळे अशुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
नगरपरिषदेने ही जोडणी रद्द केली नाही तर आपण शांत बसणार नाही. रत्नागिरीत या जोडणीविरोधात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली जाईल. जनतेच्या स्वाक्षरीने जोडणीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Cancel tuition in Tivand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.