‘त्या’ बछड्याला मिळाली आईच्या मायेची उब !
By Admin | Updated: August 24, 2014 00:41 IST2014-08-24T00:41:13+5:302014-08-24T00:41:25+5:30
वन अधिकाऱ्यांचा प्रयोग यशस्वी

‘त्या’ बछड्याला मिळाली आईच्या मायेची उब !
अयोध्याप्रसाद गावकर, पुरळ : माणूस असो की जनावर. आईची माया सारखीच असते याची प्रचिती शनिवारी वाडा येथे आली. काल विहिरातून मुक्त केलेल्या बछड्याला त्याच्या आईने म्हणजेच मादी बिबट्याने शोधून काढून सोबत नेले.
काल, शुक्रवारी सकाळी वाडा येथील माई परब यांच्या माड बागायतीमधील विहिरीमध्ये सुमारे तीन महिन्यांचा बिबट्याचा बछडा पाण्यामध्ये घायाळ अवस्थेत आढळला होता. या बछड्याला वनअधिकारी व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांनी या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले. बछडा लहान असल्याने त्याला भक्ष्य मिळविणे शक्य नसल्याने त्याला त्याच्या आईच्याच ताब्यात देणे महत्त्वाचे होते. वन अधिकाऱ्यांनी मिळालेल्या ठिकाणी बछड्याला एका छोट्या पिंजऱ्यामध्ये ठेवले. पिंजऱ्याच्या दरवाजाला दोरी बांधून तेथीलच जवळ असलेल्या पंपशेड इमारतीमध्ये ती दोरी हातात घेऊन वन अधिकारी दडून बसले होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास बछडा पडलेल्या विहिरीजवळ बिबट्या मादी येऊन आपल्या बछड्यासाठी गुरगुरू लागली. हा आवाज ऐकून त्या बछड्याने आईला प्रतिसाद दिला आणि बछडा पिंजऱ्यामधून मुक्तता होण्यासाठी धडपडू लागला. ही गोष्ट वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने बछड्याला आईच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी खेचून बछड्याची मुक्तता केली. बछडा आईसोबत निघून गेला. वन अधिकाऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी घडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
ं