khed-photo91 लॉकडाऊनच्या निषेधार्थ खेड येथील व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर निषेध फलक लावले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या
लॉकडाऊन नियमांचा भंग केल्याप्रकरणी खेड शहरातील व्यावसायिकांवर गुन्हे दाखल
करण्यात आल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाबाहेर लॉकडाऊनच्या
विरोधात फलक झळकावून लॉकडाऊनचा निषेध केला आहे.
कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनची
हाक दिली आहे. मात्र, व्यावसायिकांनी या लाॅकडाऊनला विराेध दर्शविला आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांवर कर्जबाजारी व्हायची वेळ आली.
विजेची बिले, नोकरांचे पगार, अन्य शासकीय कर भागवताना व्यापारी पुरता कोलमडून गेला
आहे. आता नव्याने कुठे सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागत
आपली दुकाने सुरू ठेवण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. शासनाला जे काही करायचे ते करूदे, मात्र आता आम्हाला आमचा व्यवसाय बंद ठेवणे शक्य नाही अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे.
तहसीलदार यांच्या दालनात ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व्यापारी आणि अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत पुढील आदेश होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला संमती दर्शविल्याने अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला हाेता. मात्र दुसऱ्या दिवशी ८ एप्रिल रोजी सकाळी शहरातील अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने नेहमीप्रमाणे उघडली. काही जणांनी अर्धवट शटर उघडून आपले दैनंदिन व्यवहार सुरु ठेवले. नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी शहरामध्ये फिरून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दुपारी बाजारपेठ बंद झाली. शुक्रवारी, ९ रोजी पुन्हा तोच अनुभव आला. सकाळी नेहमीप्रमाणे बाजारपेठ गजबजली हाेती. दुकाने उघडल्याने ग्राहकांनीही गर्दी केली. काही जणांनी आपली दुकाने शुक्रवारीही अर्धवट स्थितीत उघडली तर काही जणांनी आपल्या दुकानांबाहेर शासनाचा निषेध करणारे फलक लावले आहेत.