लाकूडतोड्यांना दणका
By Admin | Updated: June 30, 2015 00:19 IST2015-06-29T23:10:40+5:302015-06-30T00:19:01+5:30
बी. आर. पाटील : अवैध तोड करणाऱ्यांना दंड

लाकूडतोड्यांना दणका
चिपळूण : चिपळूण व गुहागर तालुक्यात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी आतापर्यंत ९३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५९ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी महिती परिक्षेत्र वन अधिकारी बा. रा. पाटील यांनी दिली.
वन खात्याने आतापर्यंत शशिकांत महिपतराव शिंदे (गणेशपूर), विनोद वसंतराव शिंदे (तिवरे), जितेंद्र शांताराम शिंदे (ओवळी), सुनील मोरे व प्रमोद मोरे (आकले) यांच्यावर कारवाई केली आहे. चिपळूण परिमंडल क्षेत्रात दंडाची एकूण २७ प्रकरणे झाली आहेत. त्यातील ७५ जणांकडून ४६ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सावर्डे परिमंडल क्षेत्रात ४ दंडाची प्रकरणे करताना १० जणांकडून ७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. गुहागर येथील ३ जणांवर दंड करताना ८ जणांकडून ६ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला. वर्षभरात १९ हजार ६९४ झाडांची तोड झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांना वन विभागाने वृक्षतोडीसाठी परवानगी दिली होती, त्या शेतकऱ्यांकडून दुप्पट वृक्ष लागवड करुन घेण्यात येणार आहे. वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत . त्यासाठी पिंपळी येथील वन विभागाच्या नर्सरीमध्ये पिंपळ, शिवण, आवळा, गुलमोहर, साग आदींच्या ५० हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. वृक्षतोडीसाठी परवानगी दिलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडून नवीन लागवडीसाठी शासकीय नियमानुसार काही रक्कमही घेण्यात आली आहे. त्यातून नवीन रोपांची निर्मिती करण्यात आली असून, काही दिवसात लागवड सुरु होईल, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकारी पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
कारवाईची माहिती...
चिपळूण व गुहागर तालुक्यात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून केलेल्या कारवाईची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. जेथे वृक्षतोड सुरू आहे तेथे कठोर उपाय योजण्यात येत असल्याची माहिती देतानाच वृक्ष लागवडीवर भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. ही कारवाई पुढे सुरू राहणार आहे.