खेड : शहरासह ग्रामीण भागात खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेतील व्यत्ययाने ग्राहक मेटाकुटीस आलेले असतानाच बीएसएनएल सेवाही पुरती कोमातच गेली आहे. कोलमडलेल्या सेवेमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल सेवेत व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच त्यात चक्रीवादळाचीही भर पडली. चक्रीवादळामुळे वीजपुरवठा पाठोपाठ खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेसह बीएसएनएल सेवेचा पुरता बोजवाराच उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा खंडित होण्याचे प्रकार कायमच असल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएल सेवेत व्यत्यय येण्याचे प्रमाण थांबता थांबेनासे झाले आहे. सतत कोणत्याही क्षणी सेवेत येणाऱ्या व्यत्ययांमुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. बीएसएनएल सेवेतील व्यत्यय दूर करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.