संदीप बांद्रे
चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २३ वरील पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील नदीवरील पूल शनिवारी अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. दसपटी विभागातील हा महत्वाचा मार्ग असल्याने दुर्घटनेमुळे या भागातील विविध गावांमधील ग्रामस्थांसह खडपोली औद्योगिक वसाहतीतील कामगारांची गैरसोय निर्माण झाली आहे.
पिंपळीतील हा पूल सन १९६५ साली बांधण्यात आला होता. पिंपळी ते गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या या पुलाच्या काही भागात तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांना माहिती दिली. घटनास्थळी उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे व त्यांचे सहकारी पोहचले. त्यांनी तात्काळ पाहणी करून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. वाहतूक बंद झाल्यामुळे दसपटी विभागाकडे जाणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली हा मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.
या ठिकाणी राजू मेस्त्री, संदेश मोहिते (खेर्डी), विलास मोहिते, मुराद अडरेकर, फिरोज कडवइकर (सरपंच, खडपोली) यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. पुलाच्या खचण्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.