लाचखोर अद्याप शिरजोरच..

By Admin | Updated: July 4, 2014 23:43 IST2014-07-04T23:34:24+5:302014-07-04T23:43:58+5:30

तक्रारींत वाढ : सहा महिन्यात ६ जणांवर कारवाई

The bribe still beats up | लाचखोर अद्याप शिरजोरच..

लाचखोर अद्याप शिरजोरच..


प्रकाश वराडकर : रत्नागिरी .गेल्या दोन वर्षांच्या काळात अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या लाचखोरीविरोधात जनतेच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांंच्या काळात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जणांविरोधात कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन लाचखोरी प्रकरणांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत कोणतेही काम ‘वजन’ ठेवल्याशिवाय होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या कठोर कारवाईनंतरही शिरजोर बनलेल्या लाचखोरांमुळे ‘वजन काही चुकेना’, अशी नागरिकांची स्थिती झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांत झालेल्या कारवायांमध्ये ज्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपी निलंबित आहेत. मालगुंड येथे तलाठी म्हणून काम करणारे अशोक हुल्लाप्पा गांजुलवार यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना १६ जानेवारी २०१४ रोजी रंगेहात पकडण्यात आले. राजापूर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक महेश सखाराम पवार याच्यावर २७ जानेवारी २०१४ रोजी दोन हजार रुपये लाचप्रकरणी सापळा लावून कारवाई केली. रत्नागिरी नगररचना कार्यालयातील लिपिक राजन गजानन बेंद्रे याला ३० एप्रिल २०१४ रोजी २ हजारांची लाच घेताना अटक झाली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत देवरुख उपविभाग कनिष्ठ अभियंता संतोष यशवंत भालेकर याला २८ जून २०१४ रोजी १३ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी देवरुखमध्ये या विभागाने दुसरी कारवाई ३ जुलै रोजी केली. त्यात देवरुखच्या उपकोषागार कार्यालयातील दीपाली दिलीप केळकर या कर्मचारी महिलेस ५०० रुपये लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आले. तसेच अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी विभागाचे उपअधीक्षक विराग पारकर यांनी कर्जत येथे जाऊन कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांच्याविरोधात १९ जून २०१४ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार असल्याने जून महिन्यात तेथील दोन सापळे रचून कारवाई करण्यात आली. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रत्नागिरीसह सिंधुदुर्गचाही कार्यभार असल्याने नजीकच्या काळात दोन्ही जिल्ह्यातील अशा अनेक केसेस पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The bribe still beats up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.