मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेत पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत विमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेतंर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत क्राॅप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकांवर माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून विमा कंपन्यांना याची दखल घेणे भाग पडणार असून शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल.
ग्रामपंचायत, कृषी कार्यालयाकडून दखल
नुकसान झाल्यास ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे माहिती देण्यात येत असे. प्रशासकीय पातळीवरून नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यामार्फत नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे, विमा कंपनीकडे पाठविला जात असे.
तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाकडेही नुकसानाची माहिती देण्यात येत असे. कृषी विभागाकडून याची दखल घेऊन तातडीने पंचनामा आटोपला जात असे. शिवाय विमा कंपन्याकडे नुकसानाचा अहवाल सादर केला जात असे.
आता आहेत नवीन
सहा पर्याय
क्राॅप इन्शुरन्स ॲपवर पिकाच्या नुकसानाची माहिती देणे बंधनकारक आहे.
विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाचा अवलंब करता येतो.
ज्या बॅंकेतून विमा हप्त्याची रक्कम भरली आहे, त्या बँकेला नुकसानाची कल्पना द्यावी.
मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाकडे नुकसान झाल्याचे कळवावे.
शासनाच्या महसूल विभागाकडेही नुकसानाची माहिती देता येते.
लेखी स्वरूपात विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात नुकसानबाबत तक्रार करता येते. सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र कळविणे बंधनकारक आहे.
अतिवृष्टीने दोन
कोटींचे नुकसान
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २,१०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी, चिखल भात खाचरात शिरल्यामुळे पिकांचे दोन कोटीचे नुकसान झाले आहे. पीक विमा योजनेतंर्गत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत कळविणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा विविध पर्याय उपलब्ध केले असून शेतकऱ्यांनी योग्य पर्यायाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जेणेकरून नुकसानीची तातडीने दखल घेणे सोपे हाईल.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.