Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:02 AM2019-07-04T05:02:55+5:302019-07-04T05:04:37+5:30

मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरणाच्या जॅकवेलनजीक मोठे भगदाड पडले.

Breached Tiware Dam 34 days after repairs; 24 missing, 13 bodies taken | Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती

Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती

googlenewsNext

रत्नागिरी : आमवस्येची रात्र त्यांच्यासाठी जणू काळरात्रच ठरली... धो धो पावसामुळे आधीच जीव मुठीत ठेऊन बसलेल्या चिपळूण तालुक्यातील भेंदवाडी गावावर तिवरे धरणफुटीचे संकट कोसळले... अख्खे गाव पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेले! मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या दुर्घटनेत २४ जण बेपत्ता झाले. बुधवारी सायंकाळपर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हाती तेरा जणांचे मृतदेह आले आहेत. बेपत्ता लोकांपैकी बळीराम कृष्णा चव्हाण हे जिवंत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. हे धरण शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने बांधले होते.

कोकणात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरणाच्या जॅकवेलनजीक मोठे भगदाड पडले. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेली १३ घरांची संपूर्ण भेंदवाडी अक्षरश: वाहून गेली. ज्यांना धरण फुटल्याचा आवाज आला, त्यांनी स्वत:चा, आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचविला. मात्र, झोपेत असलेल्या २४ जणांना पाण्याच्या लोंढ्याने ओढून नेले. त्यापैकी तेरा जणांचे मृतदेह बुधवारी एनडीआरएफच्या मदत पथकाच्या हाती लागले. उर्वरित ११ जणांचा अजूनही शोध सुरू आहे.

धरण ओसंडून वाहत असल्याची माहिती मिळताच क्षणी लघू पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत धरण फुटून पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे धरणाकडे जाण्याच्या मार्गावरील दादर पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे चिपळूणचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला. बुधवारी सकाळी धरणातील पाणी ओसरल्यानंतर पूल वाहतुकीसाठी मोकळा झाला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मंगळवारी रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याच्या पथकाने तातडीने मदत कार्य सुरू केले.

बुधवारी सायंकाळपर्यंत १३ मृतदेह हाती आले आहेत. शोभ मोहिमेदरम्यान चंद्रभागा कृष्णा चव्हाण (४५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५५), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), शारदा बळीराम चव्हाण (४८), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), संदेश विश्वास धाडवे (१८), नंदाराम महादेव चव्हाण (५५), वैष्णवी रवींद्र चव्हाण (२०), राकेश दत्ताराम घाणेकर (३५), रेश्मा रवींद्र चव्हाण (४५), रवींद्र तुकाराम चव्हाण (५0), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), अनंत हरिभाऊ चव्हाण (६३) यांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तिवरे भेंदवाडी पूर्णपणे रिकामी करण्यात आली असून ग्रामस्थांची तिवरे हायस्कूलमध्ये व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

तिवरेच्या अलीकडे कादवड गावाची स्मशानशेड, पाणीपुरवठा करणारी बोअरवेल यांची मोडतोड करत पाणी नीलिमा रविंद्र सकपाळ यांच्या घरात घुसू लागले. पाण्याची पातळी वाढत पाच फूटावर जात असल्याचे पाहून अक्षय या मुलाने प्रसंगावधन राखून २ लहान मुलांसह एकूण ६ जणांना सगळ्यांना माळ्यावर हलवले. त्याच्या निर्णयामुळे सर्वजण वाचले. घरातील साहित्याची हानी झाली याच घरातील पोस्ट आॅफिस, कागदपत्रे व अन्य साहित्य भिजले. एक अ‍ॅक्टिवा गाडी वाहून गेली.

तिवरे गावात पोफळी येथून जोरदार पावसात धरण व नदीतले मासे पकडण्यासाठी पोफळी व कोंडफणसवणे येथून राकेश घाणेकर, आपल्या अन्य दोन वडाप व्यावसायिक मित्रांसह मुक्कामी होता. ३५ वर्षीय राकेशचा मृतदेह मिळताच सकाळपासून तिथे असलेले अलोरे पंचक्रोशीतील व्यावसायिक व पोफळीवासीयांनी भावनांना वाट करून देत तीव्र दु:ख व्यक्त केले. तुकाराम शंकर कनावजे (४०) आपल्या अंगणात होते. त्यांना संकटाची जाणीव झाली. त्यांनी घरातल्या सवार्ना डोंगरावर नेले. वृद्ध महिलेस पाठीवर घेतले त्यांच्या प्रसंगवधांमुळे ५ जीव वाचले आहेत.

पोलिसांनी मदत कार्य करणा-या मंडळींना वगळता अन्य गाड्यांना ३ किलोमीटरमागे ग्रामदैवत मंदिरसमोर रोखून धरले. यामुळे चिपळूण तालुक्यातील नागरिकांना ३ किमी अंतर चालत जाऊन या घटनास्थळाला भेट द्यावी लागली. हजारोचा जनसमुदाय येथे गर्दी करून पाहणी करत होता.

लघुपाटबंधारे खात्याची बेपर्वाई
लघुपाटबंधारे खात्याच्या बेपर्वाईमुळे आम्ही हे भोगलं. २ वर्षे ओरडत आहोत. धरण गळती गंभीरपणे घ्या, पण योग्य कार्यवाही केली नाही, अशी कैफियत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हाण यांनी सभापती पूजा निकम, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोलकर यांच्यासमोर मांडली.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
तिवरे धरणाची मे महिन्यात दुरुस्ती झाली होती. तरीही हे धरण फुटले. ठेकेदाराने निकृष्ट काम केले काय, अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे काय, कोण या प्रकाराला जबाबदार आहेत याची सखोल चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना सांगितले.

५ लाखांची मदत
तिवरे धरणफुटीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून, ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्या सर्वांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून देणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कामथे येथे दिली.

निधी वेळेत मिळाला असता तर...
धरणाला दुरुस्तीची गरज असल्याचे आधीच लक्षात आले होते. खा. विनायक राऊत यांनी या कामाकडे लक्ष देण्याची सूचना अधिकाºयांना केली होती. त्यावेळी माती टाकून दुरुस्ती केली. दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव आधीच पाठविण्यात आला होता. तो निधी वेळेत मिळाला असता तर... सर्व ग्रामस्थांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

दगड आणि माती टाकून केली होती दुरुस्ती
- २000 साली झाले बांधून
- २0१७मध्ये कालव्याच्या मुख्य दरवाजापाशी गळती सुरू. ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याला निवेदने दिली.
- १२ मे, २0१९ रोजी धरणाची पाहणी केली. चार दिवसांत दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन दिले.
- ३0 मे रोजी कालव्याच्या मुख्य दरवाजानजीक दुरुस्ती करण्यात आली. दगड आणि माती टाकून ही दुरुस्ती करण्यात आली.

Web Title: Breached Tiware Dam 34 days after repairs; 24 missing, 13 bodies taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.