‘बुरोंडी पॅटर्न’ जाणार राज्यभर !
By Admin | Updated: February 15, 2015 00:48 IST2015-02-15T00:48:41+5:302015-02-15T00:48:41+5:30
पोलीस महासंचालकांकडून दखल : पोलिसांनी गावात वाटले पेढे

‘बुरोंडी पॅटर्न’ जाणार राज्यभर !
शिवाजी गोरे, दापोली : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील हिंदू-मुस्लिम समाजाने केलेला सामाजिक सलोख्याचा करार ‘लोकमत’च्या माध्यमातून राज्यभर पोहोचताच राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या अनोख्या उपक्रमाची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, सलोख्याचा हा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचा निश्चयही त्यांनी केला आहे.
बुरोंडीतील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एक समन्वय समिती स्थापन केली. या समन्वय समितीत दोन्ही बाजंूचे मिळून ११ सदस्य आहेत. दोन्ही समाजांच्या हितासाठी जाती, धर्म बाजूला ठेवत मानवता हाच धर्म मानून एकत्र येण्याचा निर्णय या समितीने घेतला. त्यासाठी १00 वर्षांचा सलोख्याचा करार करण्यात आला.
या सलोख्याच्या कराराचे वृत्त ‘लोकमत’मुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत गेले. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनीही या सलोख्याच्या कराराची दखल घेतली आहे. दोन्ही समाजांमधील तणावाचे प्रसंग टाळण्यासाठी राज्यभरात सर्वत्र हा करार पोहोचविण्यासाठी आता त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी या कराराची प्रत आपल्याकडे पाठविण्याची सूचना रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना केली आहे. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी गुरुवारीच हा करार त्यांच्याकडे रवाना केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावामध्ये पाठवून गावच्या या उपक्रमाचे जाहीर कौतुक करण्याची सूचनाही महासंचालकांनी केली आहे. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले यांना तत्काळ बुरोंडी येथे पाठवून दिले.
भोसले यांनी शुक्रवारी बुरोंडी गावाला भेट देत या कराराचे कौतुक केले. संवेदनील गावाने एक पाऊल पुढे टाकत राज्यापुढे नवा आदर्श घालून देणे खूपच कौतुकास्पद
आहे. या करारामुळे गावाची ओळख आता संपूर्ण देशाला होईल, असे सांगत त्यांनी गावाचे आभार मानले. इतकेच नाही तर भोसले तसेच पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी गावाचे अभिनंदन करत ग्रामस्थांना पेढाही भरवला.यावेळी पंचक्रोशी समन्वय समिती अध्यक्ष प्रदीप सुर्वे, उपाध्यक्ष महमद मिरकर, सरपंच प्रदीप राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील कुळे, बाजारपेठ समन्वय समिती अध्यक्ष सुधीर पोवार, बंदर मोहल्ला अध्यक्ष महामूद आदम दिवेकर, शिरीष केळसकर, नितीन साठे, अब्दुला शिरगावकर, दादा शेरे, मकबूल मस्तान, बरकत बुरोंडकर, लाडघर सरपंच राजेश्वर सुर्वे, रवींद्र नाचरे, बापू नांदलस्कर, बंटी केळस्कर, महेंद्र राणे, अमोल पावसे, रमेश बुरोंडकर, समद पटेल, आशरफ मस्तान, इम्तियाज हर्चिलकर, फैज अहमद शिरगावकर, गाणी चेलकर, हनिफ गावकरकर, शबाब मस्तान, रहिमातुला मस्तान, बापू केळस्कर, अमरीश हेदुकर, सुशांत रांगले, राजू जाधव यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम बांधवांसह मान्यवर उपस्थित होते. बुरोंडी गावाने तयार केलेल्या सलोख्याचा नवा कराराची प्रत समन्वय समितीने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले यांच्याकडे सुपुर्द केली. दुसरी प्रत दापोलीचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे आभार
सामाजिक सलोख्याची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचा उपक्रम राज्यभर पोहोचवल्याबद्दल बुरोंडीच्या ग्रामस्थांनी लोकमतचे आभार व्यक्त केले. लोकमतने हे वृत्त
१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते.
संवेदनशील गावाचा कलंक या कराराने पुसला गेला असून
आता नवा पायंडा सुरू झाला आहे. गावात किंवा पंचक्रोशीत समन्वय समितीची जबाबदारी वाढली आहे. सामाजिक सलोख्याची जबाबदारी
नक्कीच पेलवू.
- प्रदीप राणे, सरपंच
बुरोंडी गावाने मानवतावादी दृष्टिकोनातून तयार केलेला सामाजिक सलोख्याचा करार राज्यभर ‘बुरोंडी पॅटर्न’ म्हणून जाईल. यापूर्वी असे प्रयोग पोलीस खात्याने केले आहेत. हा करारसुद्धा धार्मिक सलोखा राखणारा आहे. - विलास भोसले
उपविभागीय पोलीस अधिकारी.
संवेदनशील गावाने पाडला सामाजिक एकोप्याचा पायंडा
बुरोंडी गाव हे अतिसंवेदनशील गाव आहे. पोलिसांचे या गावावर विशेष लक्ष होते. पण आता या संवेदनशील गावानेच सलोख्याचा आदर्श घालून दिला आहे. - विनायक गायकवाड,
पोलीस निरीक्षक