घेरापूर्णगड खाडीत दोघे बुडाले

By Admin | Updated: April 15, 2015 01:06 IST2015-04-15T01:06:20+5:302015-04-15T01:06:20+5:30

एकाचा मृतदेह सापडला : तरुण नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे

Both swirled at Garafulagarh bay | घेरापूर्णगड खाडीत दोघे बुडाले

घेरापूर्णगड खाडीत दोघे बुडाले

रत्नागिरी : तालुक्यातील घेरापूर्णगड येथील खाडीत स्नानासाठी गेलेले दोन तरुण बुडाले. त्यातील महंमद आवेस शेहजाद अहमद (वय १८, मालेगाव, जि. नाशिक) याचा मृतदेह दुपारी १ वाजता सापडला. महंमद अब्दुल्ला हाजी इम्रान (१८, मालेगाव) याचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू होता. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मालेगाव येथून जमातीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी १९ तरुण मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास घेरापूर्णगड येथे आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेने पूर्णगड गाव खाडी किनाऱ्यावर जमा झाले होते.
मालेगाव-नाशिक येथून हा तरुणांचा गट जमातीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी घेरापूर्णगड येथील किल्ला मशिदीत मंगळवारी सकाळी आला होता. हे सर्व तरुण खाडीकिनाऱ्यावर गेले. अरबी सागराच्या मुखाशीच हे ठिकाण आहे. या १९ तरुणांपैकी २ तरुण पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यावेळी तेथे असलेले त्यांचे अन्य सहकारी घाबरले. काय झाले, कोण बुडाले, असे ग्रामस्थांनी विचारले असता माहिती नाही, असे उत्तरही प्रथम त्या घाबरलेल्या तरुणांनी दिले. त्यानंतर दोघेजण बुडाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ मच्छिमारी नौकांद्वारे शोध सुरू केला.
५ मच्छिमारी नौका त्या बुडालेल्या दोन तरुणांचा खाडी व समुद्रात शोध घेत होत्या. दुपारी १ च्या सुमारास महंमद आवेस शेहजाद अहमद याचा मृतदेह मच्छिमारांना सापडला. तोपर्यंत पूर्णगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी शासकीय यंत्रणेकडून फार हालचाल झाली नसल्याचे ग्रामस्थांनीच सांगितले. सायंकाळपर्यंत दुसऱ्या तरुणाचा शोध मच्छिमार घेत होते.
जमातीच्या कार्यक्रमासाठी ठरलेल्या विभागात तरुणांचा गट व धर्मगुरू असे ४० दिवस फिरतात. त्याठिकाणी माहिती दिली जाते. तरुणांचा हा गटही अन्य ठिकाणी जाऊन मंगळवारी सकाळी घेरापूर्णगड येथे दाखल झाला होता. मात्र, या दुर्घटनेने अन्य तरुणही घाबरून गेले. हे सर्व तरुण उद्या अन्यत्र जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार व सहकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व दुपारी १ वाजता सापडलेला मृतदेह नंतर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Both swirled at Garafulagarh bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.