राजापुरातील दोन्ही कोविड रुग्णालये लवकरच सुरू करणार : राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:45+5:302021-05-23T04:30:45+5:30
राजापूर : कोरोना संकट काळात राजापूरकरांना गेले वर्षभर प्रतीक्षा लागून राहिलेल्या राजापुरातील ओणी व रायपाटण येथील शासकीय कोविड रुग्णालयांचे ...

राजापुरातील दोन्ही कोविड रुग्णालये लवकरच सुरू करणार : राजन साळवी
राजापूर : कोरोना संकट काळात राजापूरकरांना गेले वर्षभर प्रतीक्षा लागून राहिलेल्या राजापुरातील ओणी व रायपाटण येथील शासकीय कोविड रुग्णालयांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाल्यास पुढील आठवड्यात या दोन्ही ठिकाणीही कोविड रुग्णालये रुग्णांसाठी सुरू होणार आहेत. बुधवार (दि.२६ मे)पर्यंत ही दोन्ही रुग्णालये सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांना सांगितले.
दोन्ही रुग्णालयांची आमदार राजन साळवी, तहसीलदार प्रतिभा वराळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री, गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी प्रत्यक्ष ओणी व रायपाटण येथे शनिवारी पाहणी केली. ओणी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हे नवीन कोविड रुग्णालय सुरू होत आहे. या ठिकाणी पाच आयसीयू बेट व २० ऑक्सिजन बेडची सोय निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. शासनाकडून या ठिकाणी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरी महिला कोविड रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे यावेळी राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले. मात्र, या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यासाठी १२ परिचारिका व अन्य कर्मचारी, तर आयसीयू बेड असल्याने एक एम.डी. फिजिशीयन व एक भूलतज्ञ यांची आवश्यकता आहे. जर एम.डी. फिजिशीयन डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत तर मात्र केवळ ऑक्सिजन बेड रुग्णालय सुरू करावे लागेल. मात्र, एम.डी. फिजिशीयन डॉक्टर उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.
या ठिकाणी कोविड आणि नॉनकोविड अशी रुग्णालयाची विभागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ३० ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणीही अंतर्गत सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत़ किरकोळ कामे बाकी असल्याचे तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद चव्हाण यांनी सांगितले. या ठिकाणी दोन डॉक्टर व सहा परिचारिका व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणीही आवश्यक तो कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.