बोगस पदव्यांनी शिक्षक बनले ‘गुरु’
By Admin | Updated: August 17, 2014 00:39 IST2014-08-17T00:33:59+5:302014-08-17T00:39:41+5:30
जिल्हा परिषद : शिक्षण विभागही अडचणीत

बोगस पदव्यांनी शिक्षक बनले ‘गुरु’
रहिम दलाल ल्ल रत्नागिरी
अलाहाबाद विद्यापीठातून पदवीधर झालेल्या प्राथमिक १४२ शिक्षकांच्या पदव्या बोगस ठरवित जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पदोन्नती नाकारली. मात्र, यापूर्वी याच विद्यापीठातून पदवी घेतलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने पदोन्नती कशी दिली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्या शिक्षकांची पदवीधर पदोन्नती रद्द करणार का, याकडेही जिल्हाभरातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिक्षण अर्धवट राहिलेल्या अनेक जणांनी मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राज्यातील मुंबई मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून अनेक पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत.
इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकऱ्या करणारे आणि जिल्हा परिषदेतील अनेक प्राथमिक शिक्षक उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदव्या धारण करुन त्याद्वारे पदोन्नती मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवी मिळविलेल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल जिल्ह्यातील काही शिक्षकांनीच पदवी बोगस असल्याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल उशिरा का होईना, अखेर शिक्षण विभागाने घेतली.
गेल्या चार-पाच वर्षांमध्ये शिक्षण विभागाने अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नतीही दिली आहे. त्यावेळी शिक्षण विभागाकडून त्याबाबत काहीही चौकशी न करताच त्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, आता अलाहाबाद मुक्त विद्यापीठाच्या पदवीबाबत शिक्षण विभागाने आक्षेप घेतला आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्या वेळी जिल्ह्यातील १४२ प्राथमिक शिक्षकानी अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाल्याचे समोर आले. त्यावेळी ती पदवी बोगस ठरवून शिक्षण विभागाने त्या शिक्षकांना पदोन्नती नाकारली. पदोन्नती नाकारल्याने त्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
संबंधित शिक्षकांनी यापूर्वी अलाहाबाद विद्यापीठातून पदवीधर झालेल्या शिक्षकांना पदोन्नती कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही आता त्या शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रश्नावरुन अडचणीत आला आहे.
अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती नाकारण्यात आली आहे. यापूर्वी या विद्यापीठाच्या पदवीच्या आधारे पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचीही पदोन्नती रद्द करण्यात येईल.
- सतीश शेवडे, सभापती,
शिक्षण समिती, रत्नागिरी.
शिक्षक अडचणीत
४शिक्षण विभागाने १४२ शिक्षकांना पदोन्नती नाकारली.
४अलाहाबाद मुक्त विद्यापीठाचे पदवीधर.
४बोगस पदव्यांनी मिळविली पदोन्नती.
४पदोन्नती रद्द करण्याबाबत जिल्हाभरातील शिक्षकांचे लागले लक्ष.
४शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्यानंतर झाली चौकशी सुरु.