चिमुकल्या अर्पणचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: May 28, 2014 01:32 IST2014-05-28T01:26:38+5:302014-05-28T01:32:15+5:30
मृतांची संख्या सहा : आंजर्ले समुद्रातील दुर्घटना; कुटुंबीयांच्या आशेवर पाणी

चिमुकल्या अर्पणचा मृतदेह सापडला
दापोली : समुद्रात बुडाल्यानंतर दोन दिवस पत्ता लागला नसला, तरी लहानग्या अर्पणच्या कुटुंबीयांच्या मनात कुठेतरी भाबडी आशा जिवंत होती. आज, मंगळवारी सकाळी त्यांच्या या आशेवर पाणी फिरले. आठ वर्षांचा अर्पण सापडला; पण त्याची प्राणज्योत मात्र मालवलेलीच होती. आधीच पाचजणांच्या मृत्यूचा घाव मनावर झेललेल्या शर्मा कुटुंबाला आणखी एक धक्का बसला. तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रात रविवारी (दि. २५) झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आठवर्षीय अर्पण शर्मा याचा मृतदेह अखेर पाळंदे समुद्रकिनारी आज सापडला. यामुळे या दुर्घटनेत मृत पावलेल्या पर्यटकांची संख्या आता सहा झाली आहे. आंजर्ले येथे फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील डांगी, शर्मा कुटुंबातील नऊजण समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते. मात्र, ओहोटीच्या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने हे सारेजण समुद्रात ओढले जाऊ लागले. त्यामध्ये संगीता ओझा, पवन डांगी, ऋती डांगी, श्याम डांगी, सविता डांगी यांचे मृतदेह रविवारी सायंकाळी सापडले, तर अन्य तिघांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, अर्पण शर्मा हा आठ वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याचे बर्याच वेळानंतर लक्षात आले. गेले दोन दिवस नौकेच्या साहाय्याने आडे दूरक्षेत्राचे पोलीस, सागरी सुरक्षा पोलीस, दापोलीचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्यासह ग्रामस्थही चिमुकल्या अर्पणचा शोध घेत होते. हर्णै ते केळशी दरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात आली. अखेरीस तिसर्या दिवशी म्हणजे आज, मंगळवारी हा मृतदेह पाळंदे येथील समुद्रकिनारी सापडला. अर्पणचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या हवाली करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)