रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील धामापूरतर्फ संगमेश्वर रामनेवाडी येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय युवतीचा जयगड देऊड खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मानसी मंगेश भाकजे (रा. रामानेवाडी, संगमेश्वर) असे युवतीचे नाव आहे.ती बेपत्ता होण्याचे कारण काय? तिने आत्महत्या केली की घातपात याचा तपास जयगड पोलिस करत आहेत.मानसी ही ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता संगमेश्वर येथून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेरीस संगेमश्वर पोलिस स्थानकात मानसी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता.दरम्यान, सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी १० वाजता तिचा मृतदेह देऊड येथील खाडीत आढळला. परिसरातील ग्रामस्थांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर जयगड पोलिसांना याची माहिती दिली. जयगड पोलिसांनी तिची चौकशी केली असता संगमेश्वर पोलिस स्थानकात ती बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांशी संपर्क साधून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.जवळपास ९ दिवसांनी तिचा मृतदेह रत्नागिरी जयगड येथील देऊड खाडीत आढळल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला. या घटनेची नोंद जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
Ratnagiri: धामापूरच्या बेपत्ता युवतीचा मृतदेह खाडीत सापडला, मानसीची आत्महत्या की घातपात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:43 IST