अवैध मासेमारी रोखण्यासाठी नौकांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:28+5:302021-07-01T04:22:28+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाळी बंदीनंतर सुरू होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत़ ...

Boats will be inspected to prevent illegal fishing | अवैध मासेमारी रोखण्यासाठी नौकांची होणार तपासणी

अवैध मासेमारी रोखण्यासाठी नौकांची होणार तपासणी

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाळी बंदीनंतर सुरू होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत़ सर्व मासेमारी नौका बंदरांमध्ये, जेटीवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत़ या नौकांची नावे आणि क्रमांक घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदीमध्ये तपासले जाणार आहेत़ ज्या नौकांचे नाव व क्रमांक नोंदी नसतील अशा नौका शोधून कारवाई करण्यात येणार आहे़

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मासळी उतरविण्याची ४६ ठिकाणे आहेत़ जिल्ह्यात एकूण ३,०७७ यांत्रिकी आणि ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत़ या अधिकृत नौकांव्यतिरिक्त इतर अनधिकृत नौका आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी आणि पर्यायाने अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि क्रमांक घेण्याचा निर्णय घेतला आहे़ तशी सूचना सर्व अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. नौकेचे नाव आणि क्रमांकाच्या नोंदी मत्स्य व्यवसाय विभागाच्या दप्तरी नसतील त्या नौका अवैध आहेत, हे स्पष्ट होणार आहे़ त्यानुसार कारवाई करणे अधिकाऱ्याना सुलभ होणार आहे़.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या या नियोजनानुसार ज्या नौका अनधिकृत आढळून येतील त्यांची माहिती मच्छिमार सहकारी संस्थांना कळविण्यात येणार आहे. काही बेकायदेशीर नौका अशा संस्थांचे सदस्य असल्याचा संशय आहे़ त्या नौकांना सवलतीचे डिझेल दिले जाऊ नये, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून कळविले जाणार आहे़ इतकेच नव्हे तर ज्या संस्थांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बेकायदेशीर नौकांना सवलतीचे डिझेल पुरविले असेल आणि त्याचा परवाना घेतला गेला असेल तर त्या नौकामालकाला राहिलेला आणि पुढचा डिझेल परतावा दिला जाणार नाही, अशी नोटीस बजावली जाणार आहे़.

Web Title: Boats will be inspected to prevent illegal fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.