भरपाईचं लोणी मंडल अधिकाऱ्याने हडपलं

By Admin | Updated: April 4, 2015 00:10 IST2015-04-03T20:52:03+5:302015-04-04T00:10:18+5:30

राजापुरातील प्रकार : मंडल कृषी अधिकाऱ्याचा प्रताप

The board of compensation was hit by the board officer | भरपाईचं लोणी मंडल अधिकाऱ्याने हडपलं

भरपाईचं लोणी मंडल अधिकाऱ्याने हडपलं

राजापूर : येथील तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असतानाच आता राजापूर मंडल कृषी अधिकाऱ्याने सन २०११-१२चे आंबा नुकसान भरपाईचे अनुदान स्वत:च लाटले. हा प्रकार उघड झाल्याने तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.एकाच सातबारा उताऱ्यावर तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले असून, या संपूर्ण आंबा नुकसान भरपाई अनुदानामध्ये लाखोंचा गोलमाल केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजापूर कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .राजापूर मंडल कृषी अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार स्विकारल्यानंतर अनिल कावतकर यांनी आपले वडील रघुनाथ नारायण कावतकर व अन्य तीन यांच्या नावे तालुक्यातील पाथर्डे येथील सर्व्हे नंबर ७१/२ वरील २०० झाडांच्या नुकसान भरपाईपोटी एक वेळ रघुनाथ कावतकर व दोनवेळा आपल्या स्वत:च्या नावे असे एकूण तीनवेळा सुमारे ५४ हजार रुपयांचे अनुदान लाटले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या नुकसान भरपाईच्या याद्यांवर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या असून तेही यामध्ये सामील असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून उघडपणे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना चकरा मारायला लावणारे अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी या कारभाराकडे डोळेझाक करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे या आंबा बागायतदारांचे नुकसान होते. त्यांना नुकसानभरपाई मिळावी, म्हणून राज्य शासनाने हेक्टरी नऊ हजार रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कृषी कार्यालयाने सर्वेक्षण करुन लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली व संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान वर्ग केले. मात्र, असे असताना कावतकर यांनी आपले वडील व अन्य तीन यांच्या नावे असणाऱ्या सर्व्हे नंबर ७१ / २मधील आंबा कलमांची चक्क तीन वेळा रक्कम वेगवेगळ्या तीन बँक खात्यांवर वर्ग करुन घेतली.प्रारंभी कावतकर यांनी त्यांच्या वडिलांची जमीन राजापूर मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत असताना वडील रघुनाथ नारायण कावतकर यांचे नाव कुंभवडे मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या यादीत टाकले व दोन हेक्टरचे अठरा हजार रुपये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या राजापूर शाखेतील खाते नंबर ११३२५८९६१२१ या रघुनाथ कावतकर यांच्या खात्यावर २ सप्टेंबर २0१३ रोजी जमा केले. त्याचा चेक नंबर ७९६३१७ असा होता. त्यानंतर राजापूर मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या यादीत पुन्हा त्याच ७/१२ साठी आपल्या वडीलांऐवजी आपल्या स्वत:च्या म्हणजेच अनिल रघुनाथ कावतकर यांच्या नावे सारस्वत बँकेच्या राजापूर शाखेत दिनांक ०३ मार्च २०१४ रोजी चेक नंबर १२०९०३ ने खाते नंबर ३४७२०३१००००१७८० वर पुन्हा दोन हेक्टरचे अठरा हजार रुपये अनुदान वर्ग केले .केवळ ऐवढ्या रकमेवरच पोट भरले नाही म्हणून की काय पुन्हा कावतकर यांनी सन २०११ - २०१२ याच आर्थिक वर्षासाठी आंबा नुकसान भरपाईचे अनुदान तिसऱ्यांदा त्याच सर्व्हे नंबर ७१ / २ वरील आंबा कलमांसाठी आपल्याच नावे स्टेट बँक शाखा, राजापूरमधील खाते नंबर ३३३२४२४३०६७ वर दोन हेक्टरसाठी अठरा हजार रुपयांचे अनुदान वर्ग करुन घेतले आहे. या सर्व्हे नंबर ७१ / २ वरील दोनशे आंबा कलमांसाठी अनिल कावतकर यानी दोन वेळा आपल्या नावे रक्कम जमा करुन घेतली आहे. त्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदच नसल्याची माहितीही उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

धक्कादायक प्रकार
रत्नागिरी जिल्ह्यात अनेकवेळा नुकसानभरपाई घेण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी न केलेल्या जागृतीचाही हात असतोच. त्यामुळे ही शेतकऱ्यांच्या नशिबातलं भरपाईचं लोणी सरळसरळ अधिकारीवर्गच हडप करत असल्याचा आरोप राजापुरात होत होता. आता ‘लोकमत’ने शोधून काढलेल्या या प्रकरणामुळे हे सत्य पुढे आले आहे.


एकाच सातबारा उताऱ्यावर वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल तीन वेळा अनुदान वर्ग.
राजापूर कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप.
सातबारा उताऱ्यावर नावाची नोंदच नसल्याची माहिती उघड.
दोनशे आंबा कलमांसाठी दोनदा भरपाई आपल्या नावावर जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार.

Web Title: The board of compensation was hit by the board officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.