रक्तदान उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST2021-05-13T04:32:01+5:302021-05-13T04:32:01+5:30
चिपळूण : तालुका युवा सेनेने शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ६५ तरुण - तरुणींनी स्वयंस्फूर्तीने ...

रक्तदान उत्साहात
चिपळूण : तालुका युवा सेनेने शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ६५ तरुण - तरुणींनी स्वयंस्फूर्तीने शिबिरात सहभागी होत रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका सचिव प्रतीक शिंदे, विशाल ओसवाल, अवधूत शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेचे खांब धोकादायक
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावातील विजेचे खांब जमिनीलगत गंजले असून, कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांमधून वारंवार तक्रारी करूनही विजेचे खांब बदलले जात नाहीत. कुरधुंडा व आसपासच्या गावांतील १०० खांब धोकादायक झाले आहेत.
ग्रामस्थांची गैरसोय
देवरुख : प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. आरोग्य केंंद्राला १५० डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, आरोग्य केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर काही क्षणातच सर्व ठिकाणचे ऑनलाईन लसीकरण नोंदणी फुल्ल झाल्याचे संदेश प्राप्त होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
मोफत उपचार केंद्र
राजापूर : तालुक्यातील नाटे ग्रामपंचायतीने नाटे विद्यामंदिरच्या सभागृहामध्ये फिवर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य तपासणी, औषधे व भोजन व्यवस्था मोफत उपलब्ध केली आहे. या क्लिनिकसाठी रुग्णवाहिका सामाजिक कार्यकर्ते संदेश पाथरे यांनी उपलब्ध केली आहे.
कारवाईची मागणी
रत्नागिरी : शहरामध्ये भंगार गोळा करणाऱ्या महिलांची टोळी निर्माण झाली असून, इमारती तसेच घरांच्या आसपास असणारे स्टिल चोरण्यात येत आहे. विहिरीवरील पंपही चोरी करून नेत असल्याने नागरिकांमधून भीती निर्माण झाली आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
गावपातळीवर सुविधा
खेड : कोरोना लसीकरणासाठी केंद्रावर होणारी गर्दी विचारात घेता व ऑनलाईनमध्ये येणाऱ्या अडचणी यावर पर्याय म्हणून ग्रामीण भागात बूथ लावून लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ यांनी केली आहे. इंटरनेट सुविधांचा असलेला अभाव यामुळे नोंदणीसाठी अडथळे निर्माण होत आहेत.
निर्जंतुकीकरण
गुहागर : भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील तहसील कार्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रशासनाच्या कार्यालयाबरोबरच पोलीस वसाहतीचे निर्जंतुकीकरण कार्यकर्त्यांनी केले. तहसीलदार लता धोत्रे, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी या कामाबद्दल आभार व्यक्त केले.
मोरीचे काम अर्धवट
लांजा : तालुक्यातील पालू - हुंबरवणे रस्त्याचे काम अद्याप अर्धवट आहे. पावसाळा तोंडावर असून, रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. सध्या बायपास कच्च्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे. रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यास पावसाळ्यात नागरिकांना त्रासदायक ठरणार आहे.
बाजारपेठ बंद
रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव - जाकादेवी बाजारपेठ दि. १३ मे १७ मे अखेर पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ वैद्यकीय सुविधा वगळता अन्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. बंद काळामध्ये जर दुकाने उघडली गेली, तर ग्रामपंचायतीतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.