१०० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:14+5:302021-07-01T04:22:14+5:30
खेड : तालुक्यातील खाडीपट्टीतील खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबके येथील जिल्हा परिषद उर्दू ...

१०० जणांचे रक्तदान
खेड : तालुक्यातील खाडीपट्टीतील खाडीपट्टा वेल्फेअर असोसिएशन व ग्रामीण क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबके येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आयोजित रक्तदान शिबिरात १०० जणांनी रक्तदान केले. या प्रतिसादाबद्दल आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.
ऑनलाईन शिबिर
दापोली : डोंबिवली पूर्व येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्रातर्फे ५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता एकादशीनिमित्त ऑनलाईन कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुरूड येथील कीर्नतकार ऋषीकेश बाळ सहभागी होणार आहेत.
बसफेऱ्यांची मागणी
दापोली : आगारातून तालुक्यात एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या फेऱ्या नेमक्याच असल्याने अधिक गाड्या सोडण्याची मागणी होत आहे. बसची आणि प्रवाशांची वेळ यात ताळमेळ होत नसल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जसजसा प्रतिसाद वाढेल, तसतशी बसेसची संख्या वाढविण्याची तयारी आगार व्यवस्थापनाने केली आहे.
गढूळ पाणीपुरठा
रत्नागिरी : शहरातील माळनाक्यापासून खालच्या परिसरात ऐन पावसाळ्यात नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नगर परिषदेने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण
खेड : भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिरमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
महिलांना मदत
चिपळूण : तालुक्यातील धामवणे गावात विधवा, निराधार तसेच आजाराने त्रस्त असलेल्या महिलांना ग्रामपंचायतीच्यावतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. याबाबतचा धनादेश नुकताच वटपाैर्णिमेच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.
एस. टी. बस सुरू
दापोली : आंजर्ले-सावणे भागात रस्ता खचल्यामुळे गेले १० महिने बंद असलेली आंजर्ले-केळशी मार्गावरील एस. टी. बस अखेर सुरू झाली. आंजर्लेचे उपसरपंच मंगेश महाडिक यांनी रस्ता दुरुस्तीसाठी तसेच एसटी सेवेसाठी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्याला यश आले आहे.
तेली समाज निवेदने देणार
गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी २ जुलै रोजी सकाळी ११ ते ४ यावेळेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी व तालुक्यांमध्ये तहसीलदार यांना निवेदने देण्यात येणार आहेत, याची माहिती जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली.
लसीकरणाला प्रारंभ
पावस : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावात लसीकरणाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. पावस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मावळंगे गावातील समाज मंदिरात डॉ. संतोष कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेने हा पुढाकार घेतला आहे.
नामी शक्कल
रत्नागिरी : पावसाळी बंदीनंतर जिल्ह्याच्या समुद्रात सुरू होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्य विभागाने शक्कल लढवली आहे. आता सर्व मच्छिमार नौका बंदरात उभ्या आहेत. या नौकांची नावे व नंबर घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत.