अंध विद्यार्थ्यासाठी बाळगला डोळस दृष्टीकोन--

By Admin | Updated: August 11, 2015 00:16 IST2015-08-11T00:16:18+5:302015-08-11T00:16:18+5:30

प्रा. दीक्षितांच्या आठवणी ताज्या : किशोर सुखटणकर

A blind eye perspective for a blind student- | अंध विद्यार्थ्यासाठी बाळगला डोळस दृष्टीकोन--

अंध विद्यार्थ्यासाठी बाळगला डोळस दृष्टीकोन--

महाविद्यालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. शिवाय अनेक अपंग विद्यार्थी आजही शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाविद्यालयातील अध्यापक व विद्यार्थ्यांनीसुध्दा या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. आता एका अंध मुलाला अकरावीमध्ये प्रवेश देण्यामागे महाविद्यालयाने डोळस दृष्टीकोन बाळगला आहे. इच्छाशक्ती असेल तर अंधत्त्व हे तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासातील अडथळा बनू शकत नाही, हीच बाब यातून आम्हाला ठळकपणे पुढे आणायची आहे. त्यासाठी त्या मुलाला ग्रंथालयात बे्रल लिपीतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तो प्राध्यापकांनी शिकविलेल्या विषयाचे आकलन करतो. त्याला वाटणाऱ्या अभ्यासातील समस्यांबाबत वर्गमित्र किंवा शिक्षकांशी चर्चाही करतो. त्याने शिकावं आणि मोठी भरारी घ्यावी, या इच्छेतून हे पाऊल उचलले आहे. जिथे एका अंध प्राध्यापकांनी ज्ञानदान केले, तिथे अंध मुलाला प्रवेश देणं गरजेचेच होते, अशी भावना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर सुखटणकर यांनी व्यक्त केली.

ब्रिटिशकालीन इमारत आणि ६६ वर्षांचा वारसा असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने यंदा अनोखा प्रयोग केला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही पारंपरिक शाखांबरोबरच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू असलेल्या या महाविद्यालयात साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात यंदा एका अंध मुलाला अकरावीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. ज्या महाविद्यालयात एका अंध प्राध्यापकाने खूप वर्षे ज्ञानदान केलं आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला, त्या महाविद्यालयाने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अंध मुलाला मदतीचा हात पुढे करणं गरजेचंच होतं, या भावनेतून हा प्रवेश देण्यात आला आहे, हीच सर्वात महत्त्वाची आणि अधोरेखित करावी, अशी बाब आहे. त्याअनुषंगाने प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : अंध विद्यार्थ्याला प्रवेश देण्यामागील उद्देश ?
उत्तर :एक व्यक्ती शिकली तर त्याचा फायदा अवघ्या कुटुंबाला होतो. आजपर्यंत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव ठेवलेला नाही. अपंग विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश देण्यात आला आहे. यापुढेही देण्यात येणार आहे. साईराज सत्यानंद कीर याचे पालक प्रवेशासाठी आले होते. त्याला दहावीच्या परीक्षेत ६१ टक्के गुण असून, तो विद्यार्थी हुशार आहे. मात्र, अंध असल्यामुळे अन्य मुलांप्रमाणे तो स्वत: वर्गात ये-जा करू शकत नाही किंवा अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करू शकणार नाही. परंतु विद्यार्थ्याचे शैक्षणिक करिअर वाया जाऊ नये, यासाठी महाविद्यालयाने त्याला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला व प्रवेश दिला.
प्रश्न : साईराजला अभ्यासाची पुस्तके उपलब्ध करून देणार का?
उत्तर :साईराज आपल्या पालकांच्या किंवा वर्गमित्रांच्या मदतीने महाविद्यालयात येतो. तो वर्गात मित्रांसोबत बसतो. प्राध्यापकांचे लेक्चर तो ऐकू शकतो. मात्र, अभ्यासासाठी लागणारी पुस्तके ब्रेल लिपीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साईराजच्या पालकांना विचारून पुस्तकांची यादी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. महाविद्यालयाची ग्रंथालय सुविधा त्याला उपलब्ध करून देत असता तेथील कर्मचारीवर्गालाही याबाबत कल्पना देण्यात येणार आहे.
प्रश्न : साईराजच्या बाबतीत शैक्षणिक व्यवस्थापन केले आहे का?
उत्तर :महाविद्यालयाच्या इतिहासात एका अंध विद्यार्थ्याला प्रवेश देणे वेगळी घटना आहे. साईराजच्या शैक्षणिक व्यवस्थापनाबाबत विचारताना तो बसणारा वर्ग, जागा, तसेच अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आश्वासित करून त्याच्या अंतर्गत परीक्षा, बाह्य परीक्षेसाठी लेखनिकाची आवश्यकता, वर्गमित्रांची सामूहिक मानसिकता, तर सहाध्यायी म्हणून साईराज याच्या गरजा याचा विचार करून व्यवस्थापन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रश्न : शासकीय निधीसाठी महाविद्यालयाकडून काही प्रयत्न?
उत्तर :साईराज सध्या नातेवाईक किंवा मित्रांसमवेत महाविद्यालयात येत असला तरी पालकांनी त्याला नेण्या-आण्यासाठी मदतनीस उपलब्ध व्हावा याकरिता शासकीय निधी उपलब्ध व्हावा, यासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी लागणारे महाविद्यालयाचे शिफारसपत्र देण्यात आले आहे.
प्रश्न : महाविद्यालयात प्रा. अरूण दीक्षित अंध होते, त्याबाबतचा अनुभव?
उत्तर : प्रा. अरूण दीक्षित इंग्रजी विषयाचे अध्यापक होते, इतकेच नव्हे तर ते इंग्रजी विभागप्रमुखही होते. एमएलएलएम होते. शिवाय कायदेविषयक बाबींमध्ये संशोधन केले होते. कायद्याचे विद्यार्थी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. पाठांतर अचूक असल्याने कायद्याचे संदर्भ ते क्षणार्धात सांगत असत. याशिवाय ज्योतिषाची आवड असल्याने ते मार्गदर्शन करीत असत. विविध अंगांनी लोक जोडलेली असल्यामुळे सरांचा जनसंपर्क अधिक होता.
प्रश्न : प्रा. दीक्षित शिकवत असलेल्या वर्गाबाबतचे अनुभव कसे होते?
उत्तर :प्रा. दीक्षित नियतवयोमानाने निवृत्त झाले. आज ते हयात नाहीत. मात्र, त्यांच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. मी स्वत:ही त्याचा विद्यार्थी राहिलो आहे. वर्गात सरांची हजेरी घेण्याची पध्दत वेगळी होती. आवाजावरून ते ओळखत असत. स्वत:ची हजेरी देऊन मित्राची हजेरी देणाऱ्याला ते अचूकपणे पकडत असत. त्यामुळे विद्यार्थीवर्गात त्यांचा दरारा होता. प्रचंड व्यासंग, विषयावरील हुकमी पकड आणि सोपेपणाने शिकवण्याची पद्धत यामुळे त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती नेहमीच चांगली असायची.
प्रश्न : शास्त्रीय प्रयोग त्यांनी केले होते का ?
उत्तर :प्रा. दीक्षित यांना शास्त्रीय प्रयोगात कुतूहल असे. एक दिवस ते भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत आले होते. त्यांनी पाणी तापवण्याची मागणी केली. विशिष्ट तापमानाला तापवलेल्या पाण्यात बोट बुडवून अचूक तापमान सांगत असत. संवेदनेमुळे त्यांना पाण्याचे तापमान कळत असे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तिचा हात हातात घेऊन ते त्या व्यक्तिला ओळखत. इतकेच नव्हे; तर त्यांच्याबद्दलची माहिती सांगत असत. सरांच्या खूप आठवणी असून, त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकच नव्हे; तर सर्व कर्मचारी मित्रांच्या स्मरणात निरंतर राहतील.
प्रश्न : साईराजला पदवीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण देणार का?
उत्तर :साईराजमुळे प्रा. दीक्षित सरांविषयी आठवणी जाग्या झाल्या. दीक्षित सरांना केवळ प्राध्यापक, कर्मचारी, गं्रथपाल यांनी नव्हे; तर विद्यार्थ्यांनीही प्रोत्साहित केलं होतं. त्याप्रमाणे साईराजलाही जाणीवपूर्वक शैक्षणिक व्यवस्थापन, बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साईराजने दहावीला प्रथमवर्ग मिळविला आहे. भविष्यात त्याने भरपूर शिकावे, अशी इच्छा आहे. आतापर्यंत महाविद्यालयाने अपंग विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याप्रमाणे साईराजसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याने यश संपादन करावे, अशी अपेक्षा आहे.
- मेहरून नाकाडे

Web Title: A blind eye perspective for a blind student-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.