दुपदरीकरणासाठी काेकण रेल्वे मार्गावर ब्लाॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:25+5:302021-08-22T04:34:25+5:30
रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरील दुपदरीकरणाच्या कामाला वेग आला असून, राेहा ते वीर दरम्यान दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले ...

दुपदरीकरणासाठी काेकण रेल्वे मार्गावर ब्लाॅक
रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरील दुपदरीकरणाच्या कामाला वेग आला असून, राेहा ते वीर दरम्यान दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही स्थानकांवरील रुळ जाेडण्याच्या कामासाठी काेकण रेल्वे मार्गावर २१ ते ३० ऑगस्ट दरम्यान मेगाब्लाॅक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना त्या - त्या स्थानकांवर विशिष्ठ कालावधीसाठी थांबा देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेऊ लागल्यानंतर काेकण रेल्वे रुळावर येत आहे. या मार्गावर गणेशाेत्सवाच्या काळात विशेष गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी दुपदरीकरणाचे काम पूर्ण करून गाड्यांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न काेकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. काेकण रेल्वे मार्गावरील राेहा ते वीर मार्गावरील ४५ किलाेमीटरचे दुपदरीकरणाचे काम पू्र्ण हाेत आले आहे. काही ठिकाणी नवीन आणि जुने रुळ जाेडणे शिल्लक आहे. हे काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या कामामध्ये काही रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या कामामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर अधिक परिणाम हाेऊ नये, यासाठी नियाेजन करण्यात आले आहे.
काेकण रेल्वे प्रशासनाने केलेल्या नियाेजनानुसार, २१ ऑगस्ट राेजी धावणारी थिरुअनंतपुरम - लाेकमान्य टिळक स्पेशल गाडी रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे थांबविण्यात आली हाेती. जामनगर - तिरूनेलवल्ली गाडी काेलाड व माणगाव येथे थांबविण्यात आली हाेती. तसेच २२ ऑगस्ट राेजी धावणारी एलटीटी - थिरुअनंतपुरम गाडी काेलाड स्थानकावर एक तास थांबविण्यात येणार आहे. हापा - मडगाव ही गाडी २५ ऑगस्ट राेजी पश्चिम रेल्वे मार्गावर तर थिरूअनंतपुरम - एलटीटी ही गाडी रत्नागिरी किंवा चिपळूण येथे एक तास, तिरुनवेल्ली - दादर ही गाडी वीर स्थानकात ३० मिनिटे, जामनगर - तिरूनवेल्ली गाडी २७ ऑगस्ट राेजी पश्चिम रेल्वे मार्गावरील कामासाठी अडीच तास उशिराने धावणार आहे. एर्नाकुलम - अजमेर गाडी २९ ऑगस्ट राेजी करंजाडी येथे अर्धा तास थांबविण्यात येणार आहे. मडगाव - मुंबई विशेष गाडी ३० ऑगस्ट राेजी चिपळूण व खेड येथे थांबविण्यात येणार असल्याची माहिती काेकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.