महामार्गावर लाखाचा काळा गूळ जप्त
By Admin | Updated: September 22, 2014 00:49 IST2014-09-22T00:47:11+5:302014-09-22T00:49:38+5:30
१५ लाखांचा ऐवज जप्त

महामार्गावर लाखाचा काळा गूळ जप्त
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत महामार्गावर गस्तीच्या वेळी दोन महिंद्रा बोलेरो पीकअप व्हॅन जप्त केल्या असून, त्यातून वाहतूक केलेल्या साडेतीनशे गुळाच्या ढेपी जप्त केल्या. या गुळाची बाजारभावाने किंमत १ लाख रुपये असून, दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण ८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच याप्रकरणी काळा गूळ विकणाऱ्या एका व्यापाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे झगडे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गावरील कोल्हापूरहून येणाऱ्या तिठ्यावर भरारी पथकाने पांढऱ्या रंगाची मालवाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच - ०९ - सीयू २२३२) ची तपासणी केली असता त्यातील दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.
त्यानंतर गाडीची तपासणी केली असता आत ताडपत्रीच्या खाली १० किलो वजनाची एक याप्रमाणे काळ्या गुळाच्या १०० ढेपी आढळून आल्या. त्या दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार हा काळा गूळ अखाद्य असून, गावठी दारू बनवण्यासाठीच वापरला जातो, असे सांगितले. त्यानंतर बाळू शिवाजी जाधव (२४, पेठवडगाव गोपाळवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व युवराज दिनकर शिंदे (३५, रा. पेठवडगाव, गोपाळवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या दोघांना दारूबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
याप्रकरणात काळ्या गुळासह वाहन मिळून ४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांची अधिक चौकशी करता त्यांनी अशाच प्रकारचा काळा गूळ याआधी खेड तालुक्यातील खोपी येथे एका व्यापाऱ्याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यासोबतच खेडमधील खोपी गावातील धामणंद फाट्यावर ज्यांना या दोघांनी काळा गूळ विकला होता, तेथे भरारी पथकाचे कर्मचारी गेले.
तेथे मोहन शंकर रेडीज (५८, धामणंद फाटा, खोपी, ता. खेड) याच्या घरासमोरील महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच०८डब्ल्यू२०९८) ची तपासणी केल्यावर त्यात व रेडीज याच्या घरात प्रत्येकी १० किलो वजनाच्या २५० काळ्या गुळाच्या ढेपी आढळून आल्या. त्याच्या ताब्यातून काळ्या गुळासह वाहन मिळून ३ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहन शंकर रेडीज याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मोहीम रत्नागिरी उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, कारवाई पथकात निरीक्षक एस. एम. तवसाळकर, निरीक्षक डी. एस. वायंगणकर, लांजाचे निरीक्षक सूरज दाबेराव, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, प्रमोद कांबळे, जितेंद्र पवार, अविनाश घाटगे, किरण बिरादार, श्यामराव पाटील आदी दुय्यम निरीक्षक व जवान विजय हातिसकर, राम पवार, करण घुणावत, सुरेश शेगर, चक्रपाणी दहीफळे, शंकर बागेलवाड, वैभव सोनावले, निनाद सुर्वे, राजेंद्र भालेकर, वाहनचालक शशिकांत पाटील, मिलिंद माळी, महिला जवान अनिता डोंगरे, महानंदा बुवा, सहायक दुय्यम निरीक्षक सुनील चिले तसेच अन्य कर्मचारी यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)