भाजप - राष्ट्रवादी हात मिळवणी
By Admin | Updated: October 24, 2015 00:55 IST2015-10-23T21:24:47+5:302015-10-24T00:55:24+5:30
देवरूख नगराध्यक्ष निवड : शिवसेनेला रोखण्यासाठी नवे डावपेच

भाजप - राष्ट्रवादी हात मिळवणी
देवरुख : देवरुख नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली आहे. यामुळे देवरुखवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. युतीमध्ये असलेल्या शिवसेनेचा हात सोडून भाजपने राष्ट्रवादीला जवळ करून सत्ता काबीज करण्याचे मनसुबे रचले आहेत. त्यामुळे नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीने वरिष्ठ पातळीवर जोरदार प्रयत्न केले आहेत.नगरपंचायतीत पहिल्या अडीच वर्षामध्ये सेना-भाजपची युती होती. या पहिल्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये पहिले सव्वा वर्ष सेनेच्या नीलम हेगशेट्ये, तर दुसरे सव्वा वर्र्ष भाजपच्या स्वाती राजवाडे यांनी पदे भूषवली होती. दरम्यान, अडीच वर्षांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पुरुषांसाठी नगराध्यक्षपदे खुले झाले. मात्र, युतीत पूर्वी ठरल्याप्रमाणे यावेळची टर्म ही शिवसेनेकडे होती. मात्र, आता या पदासाठी चक्क चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नंदादीप बोरुकर आणि प्रमोद पवार यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल भुवड आणि भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ‘वन टू का फोर’ स्थिती निर्माण झाली आहे.या सगळ्या घडामोडींचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार केला तर सध्या राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकमेकांशी संधान साधल्याचे दिसत आहे. तशी गुप्त बैठका वरिष्ठ पातळीवर झाल्याची चर्चादेखील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत. सध्याच्या पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपच्या ५ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या ५ जागा अशा १० जागा एकत्रित येण्याची दाट स्थिती निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या दोन उमेदवारांपैकी एकाने अर्ज माघारी घेतल्यास त्यांच्या असलेल्या ७ जागांमध्ये केवळ दोन जागांची गरज आहे. असे असताना २४ रोजी कोण कोण अर्ज माघारी घेणार याकडे लक्ष आहे. शुक्रवारी भाजपचे ५ व राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक दुपारपासूनच गायब होते. (प्रतिनिधी)