गुहागरमध्ये प्रशासनासाठी भाजपतर्फे निर्जंतुकीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:36+5:302021-05-13T04:31:36+5:30
असगोली : कोविड युध्दातील पहिल्या फळीत काम करणारे म्हणून गुहागर तहसील कार्यालय तसेच पोलीस वसाहतीचे निर्जंतुकीकरण येथील भाजपतर्फे करण्यात ...

गुहागरमध्ये प्रशासनासाठी भाजपतर्फे निर्जंतुकीकरण मोहीम
असगोली : कोविड युध्दातील पहिल्या फळीत काम करणारे म्हणून गुहागर तहसील कार्यालय तसेच पोलीस वसाहतीचे निर्जंतुकीकरण येथील भाजपतर्फे करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेबरोबर पोलीस आणि महसूल प्रशासनही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आरोग्य विभागाच्या इमारती सातत्याने निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था उभी आहे. मात्र, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे ही यंत्रणाच नाही. ही बाब लक्षात घेऊन उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गुहागर शहरातील प्रशासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संजय मालप आणि अन्य भाजप कार्यकर्त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली.
जैतापकर यांनी साहित्य उपलब्ध करुन दिले. संजय मालप, शार्दुल भावे, अमर देवाळे, तानाजी कदम, अमर जोशी या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय, महापुरुष मंदिर आणि संपूर्ण पोलीस वसाहत यांचे निर्जंतुकीकरण करुन दिले. तहसीलदार लता धोत्रे, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी या कामाबद्दल भाजप व संतोष जैतापकर यांचे आभार मानले आहेत.
संतोष जैतापकर यांनी मुंबईमध्ये विविध रुग्णालयात काम करणाऱ्या कोकणातील रहिवाशांची एक टीम उभी केली आहे. या टीममध्ये २० डॉक्टर्स, १०० पेक्षा जास्त परिचारिका आणि ५० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या टीमद्वारे वसई, विरार, भाईंदर, पालघर या परिसरातील कोरोनाग्रस्त कोकणवासियांना उपचारांपासून रुग्णालयात भरती करेपर्यंतची सर्व व्यवस्था केली जात आहे.