चिपळुणातील कोट्यवधीचे रस्ते अडकले वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:58+5:302021-09-18T04:34:58+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील उक्ताड व मार्कंडी या कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांची केवळ ६ महिन्यांत ...

Billions of roads in Chiplun are embroiled in controversy | चिपळुणातील कोट्यवधीचे रस्ते अडकले वादात

चिपळुणातील कोट्यवधीचे रस्ते अडकले वादात

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : शहरातील उक्ताड व मार्कंडी या कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांची केवळ ६ महिन्यांत धूळदाण झाल्याने संबंधित ठेकेदारांना नगरपरिषदेने नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांना दुरूस्ती करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, असे असले तरी यामुळे दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे ग्रहण लागलेल्या उक्ताड व मार्कंडी या दोन रस्त्यांना काही महिन्यांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आली. ती देताना उक्ताड रस्त्यावर सुमारे ९१ लाख ३०० रुपये, तर मार्कंडी रस्त्यावर सुमारे १ कोटी १९ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यांवर अनेक थर असल्याने ते आता टिकाऊ झाले असतील, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, परिस्थिती वेगळीच असून केवळ ६ महिन्यात हे दोन्ही रस्ते खराब होताना दिसत आहेत. उक्ताड रस्त्यावरील काही भाग खराब झाला असून त्यावरील खडी बाजूला झाली आहे तर मार्कंडी रस्त्याला खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. याबाबत आता नागरिकांमधून तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून ठेकेदारांमध्येही खळबळ उडाली आहे.

संबंधित ठेकेदारांना नगरपरिषदेने नोटीस दिल्या असून, दुरूस्ती करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर ठेकेदारांनीही तीन वर्षांची हमी दिली असल्याने आम्ही दुरूस्ती करून देऊ, असे कबूल केले आहे. मात्र, ते दुरूस्ती करून देणार असले तरी कोटीच्या रस्त्यांना नेमका दर्जा काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच दुरूस्ती करून दिल्यावर तो मुलामा किती महिने राहणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे दुरूस्तीसह कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

----------------------

आता महापुराचे कारण

कोट्यवधी रूपये खर्च करून उखडत चाललेले रस्ते ही ठेकेदारासह लोकप्रतिनिधींसाठी नामुष्कीजनक बाब आहे. यावर झाकण घालण्यासाठी महापुराचे कारण पुढे केले जात आहे. मार्कंडी रस्ता मे महिन्यापासूनच खराब झाला असून, उक्ताड रस्ता ज्या भागात खराब झाला आहे, तेथे महापुराच्या पाण्याचा काहीही संबंध नाही. मात्र, तरीही या दोन रस्त्यांसह अन्य रस्त्यांच्या कामातही महापुराचे कारण पुढे केले जात आहे.

Web Title: Billions of roads in Chiplun are embroiled in controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.