समुद्र सुरक्षेच्या जागृतीसाठी दुचाकी रॅली
By Admin | Updated: June 8, 2014 00:56 IST2014-06-08T00:54:43+5:302014-06-08T00:56:55+5:30
समुद्र तट सुरक्षेच्या जनजागृतीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्यावतीने रत्नागिरी येथील विमानतळावर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

समुद्र सुरक्षेच्या जागृतीसाठी दुचाकी रॅली
रत्नागिरी : समुद्र तट सुरक्षेच्या जनजागृतीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्यावतीने रत्नागिरी येथील विमानतळावर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मोटरसायकलसह भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र सागरी सुरक्षा पोलीस, कस्टम विभाग आणि मत्स्य विभाग यांच्या एकूण १४ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेल्या या रॅलीचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी झेंडा दाखवून केले. रॅलीचे नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर एस. एम. सिंह यांनी केले.
समुद्र तट सुरक्षा हा एक गंभीर व अतिमहत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यात तटीय भागातील कोळी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांशी संवाद साधणे, त्यांना समुद्र तटाच्या संरक्षणाचे महत्व पटवून देणे आणि प्रभावी सागरी सुरक्षेचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने मच्छिमार बांधवाना सागरी संगठनांचे डोळे व कान बनविणे, हा मुख्य उद्देश असल्याचे कमांडर सिंंह यांनी सांगितले.
तसेच यावेळी मच्छिमार बांधवांना समुद्र तटाच्या संरक्षणाबाबतचे व मासेमारी, पर्यावरणासंबंधी नियमांचे प्रचार व प्रसार साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मासेमारी करताना मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. या उपक्रमाला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)