किनाऱ्यावर महाकाय लाटांचे थैमान
By Admin | Updated: July 6, 2016 00:37 IST2016-07-05T22:34:25+5:302016-07-06T00:37:52+5:30
बंधारा लाटांनी गिळंकृत केल्याने समुद्राचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्याची ही समस्या कायम होती.

किनाऱ्यावर महाकाय लाटांचे थैमान
रत्नागिरी : पावसाची जोड व नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे दर्या चांगलाच उधाणलेला होता. वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुमारे १२ ते १३ फूट उंचीच्या महाकाय लाटा समुद्रकिनारी धडकल्या. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.गेले आठ दिवस समुद्रकिनारी पावसाने थैमान घातले होेते. त्यात नैऋत्य दिशेने ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची जोड समुद्राच्या उधाणाला मिळाली होती. अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकत असल्याने किनारी राहणाऱ्या रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.मंगळवारी या महिन्यातील सर्वांत मोठी भरती होती. त्यामुळे त्याला नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्याची साथ लाभल्याने दर्या अधिकच उधाणलेला होता. त्यामुळे अजस्त्र लाटांचा मारा मांडवी जेटीवर होत होता. त्याचबरोबर खडपेवठार, घुडेवठार, चवंडेवठार, राजीवडा या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांवरून पाणी येत होते. अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे दिसून आले. मिऱ्यावासीयांची धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची समस्या दरवर्षीची डोकेदुखी ठरली आहे. पंधरामाड ते भाटीमिऱ्या परिसरातील ५०० मीटरचा बंधारा लाटांनी गिळंकृत केल्याने समुद्राचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी त्याची ही समस्या कायम होती. त्यामुळे मिऱ्यावासीयांची दरवर्षीची ही समस्या संपता सपेना, अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)