भोस्तेत राडा; आठजण अटकेत
By Admin | Updated: February 2, 2016 23:38 IST2016-02-02T23:38:55+5:302016-02-02T23:38:55+5:30
गाडीला बोजू देण्यावरून दोघा दुचाकीस्वारांमध्ये वाद.

भोस्तेत राडा; आठजण अटकेत
खेड : भोस्ते गावातील जलाल शेख मोहल्ला येथे दोन दुचाकीस्वारांमध्ये बाजू देण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
भोस्ते जलाल शेख मोहल्ला येथील मुब्बसीर ऊर्फ पप्पू हमजा माटवणकर (३१), शोएब इसा पोफळणकर (३०) व अकबर याकुब मांजरेकर (३२), तर शिवफाटा-खेड येथे राहणारे रोनीत अनिल इनरकर (२२), रोहन अनिल इनरकर (४५) या आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शादाब पोफळणकर, मोबीन शेख व इतर वीस जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रोनीत अनिल इनरकर हा आपल्या मित्रांसमवेत दुचाकीने रेल्वेस्टेशनकडे जात असताना शोएब पोफळणकर रेल्वे स्टेशनकडून दुचाकीने येत होते. त्यावेळी त्याच्या गाडीला बाजू देण्यावरुन बाचाबाची झाली. यातील रोनीत इनरकर याने आपल्या आई-वडिलांना ही हकीकत सांगितल्यानंतर ते घटनास्थळी आले. रोहन अनिल इनरकर व अनिल देवराम इनरकर (५८) अनिता अनिल इनरकर (४५) हे तिथे पोहोचले. त्यानंतर जमावाने इनरकर कुटुंबियांना हाताच्या ठोशाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली व शिवीगाळ केली. त्यानंतर इनरकर कुटुंबीय थेट खेड पोलीस स्थानकाकडे आपल्या दुचाकीने जात असतानाच अनिता इनरकर यांची दुचाकी अडवून त्यांना मोटरसायकलवरुन खाली पाडले. त्यांच्या अंगावरील पोषाख फाडला. तसेच असभ्य वर्तन केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद अनिता अनिल इनरकर यांनी खेड पोलिसांत दिली आहे.
इनरकर कुटुंबियांच्या विरोधात रोहन इसान पोफळणकर जलाल शेख मोहल्ला याने खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार रोनीत अनिल इनरकर, बॉबी खेडेकर, अनिल इनरकर, अनिता इनरकर व अमोल यालाप्पा (सर्व रा. शिवफाटा) यांच्या विरोधात दुचाकी अडवून मारहाण केल्याची फिर्याद खेड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक डी. एम. जाधव तपास करीत आहेत. ही घटना भोस्ते विराचीवाडी येथे सायंकाळी घडली. मंगळवारी सकाळी ८ वाजता ३ आरोपींना तर स. १२.३० वा. ५ जणांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)