भास्कर जाधव यांच्या प्रचारात भाग घेणार नाही
By Admin | Updated: September 22, 2014 00:49 IST2014-09-22T00:45:08+5:302014-09-22T00:49:57+5:30
नीलेश राणे : अजूनही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्वाळा

भास्कर जाधव यांच्या प्रचारात भाग घेणार नाही
मालवण : लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. यामुळे गुहागर मतदारसंघात जाधव यांच्या प्रचारात आपण भाग घेणार नाही. हा मतदारसंघ सोडून संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपली प्रचार यंत्रणा काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका रत्नागिरी - सिंधुदुर्गचे काँग्रेस प्रचारप्रमुख, माजी खासदार नीलेश राणे यांनी मांडली.
मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत नीलेश राणे बोलत होते. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात आपण प्रचाराला जाणार नाही. लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधवांनी आपल्या विजयासाठी कोणतीही मदत केली नाही. प्रचार सभांनाही त्यांची अनुपस्थिती दिसत होती. त्यांना गुहागर मतदारसंघातील काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी या मतदारसंघातून त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असतो तर नक्कीच विजयी झालो असतो. मात्र, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या आदेशाने आपण या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी आपल्यावर रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या विनायक राऊत यांचा विजय हा मोदी लाटेतील विजय होता. अन्यथा राऊत यांची खासदार बनण्याची पात्रता नव्हती. आता विकासाच्या वल्गना करणाऱ्या खासदारांनी तो प्रत्यक्षात कृतीतून दाखवून द्यावा. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले आमदार दीपक केसरकर हे पूर्वी शरद पवारांच्या फोटोंची पूजा करत होते. आता पवारांचा फोटो मोती तलावात सोडून कुणाची पूजा करतात, अशी टीका नीलेश राणे यांनी केली. मालवण - कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ते नारायण राणे यांच्यासमोर विरोधी उमेदवार ठरूच शकत नाहीत. नाईक यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचेही राणे म्हणाले.
यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मालवण येथील पत्रकार परिषदेत निलेश राणे यांचा निर्धार.
गुहागर मतदारसंघ वगळता रत्नागिरी, सिंधुदूर्गातील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी यंत्रणा राबवणार.
गुहागरात निवडणूक रिंगणात उतरलो असतो तर भास्कर जाधवांविरोधात नक्कीच विजयी झालो असतो : राणे
नाईक यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवणार : निलेश राणे.