लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर सद्यस्थितीत बाधितांना कोणतीही अडचण नसतानाही तेथील स्वयंघोषित पुढारी दुर्घटनेच्या नावावर वीजबिलासारखे किरकोळ काही खर्च दाखवून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व राजकीय - सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.
धरण दुर्घटनेला २३ महिने पूर्ण झाले आहेत. बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी अलोरे येथे २४ घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यातील १२ घरांचे बांधकाम जयंद्रथ खताते व १२ घरांचे काम दशरथ दाभोळकर करत आहेत. खासदार विनायक राऊत व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून वीजबिलासारखा जटील प्रश्नही काही दिवसांपूर्वी कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. मात्र, असे असतानाही येथील स्वयंघोषित पुढारी निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. दानशूर मंडळींना तिवरे येथील बाधित कुटुंबीयांची सुस्थितीत असलेली परिस्थिती जास्त उगाळून सांगितल्यावर आपलाही हातभार लागावा, अशी जाणीव होऊन अनेकजण मदत करतात. सध्या कोणत्याही प्रकारची अडचण नसताना, काही खर्च नसताना कशासाठी रक्कम गोळा केली जात आहे. शिवाय जमा रक्कम कोणाकडून व कशासाठी आणली, याचा थांगपत्ता बाधित कुटुंबीयांना नसतो. तिवरेतील बाधित कुटुंबीयांचे नाव पुढे करुन मदत मागणाऱ्यांना कोणीही आर्थिक, वस्तूरुपी मदत करू नये, असे आवाहन बाधितांतर्फे अजित चव्हाण, विश्वास घाडदे, संतोष कनावजे, शिवाजी चव्हाण यांनी केले आहे.